मालवण : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या उपविभागीय कार्यालयात विद्युत वितरण विभाग, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक 'ऊर्जा मित्र बैठक' आयोजित करण्यात आली.
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीत वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींवर समन्वयाने चर्चा करून त्यांचे निवारण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीदरम्यान ग्राहक पंचायत, शाखा मालवण यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात मे २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत मालवण विभागात किती कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित राहिला, याची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालवणचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष प्रताप बागवे, संघटक नितीन वाळके, सहसंघटक महेश काळसेकर, सचिव निळकंठ मालणकर, जिल्हा सदस्य प्रमोद मोहिते, सल्लागार रत्नाकर कोळंबकर तसेच वीज ग्राहक पुष्कराज तायशेटे, सदाशिव आरोलकर, रविंद्र धुरी आणि सचिन गवंडे उपस्थित होते.
याशिवाय, ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊनही अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी कुंभारमाठ हुतात्मा स्मारक परिसरातील तक्रारदार ग्राहकांनीही लेखी निवेदन सादर केले.

मालवण येथे 'ऊर्जा मित्र बैठक'; वीजपुरवठा खंडित कालावधीची माहिती देण्याची ग्राहक पंचायतची मागणी
