राहुल जाधव : मालवण | प्रतिनिधी : यूथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स संलग्न 'निसर्ग शाळा' (तिसरे वर्ष) उद्घाटन कार्यक्रम रविवारी सायंकाळी ४ वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला नवीन विद्यार्थी, त्यांचे पालक, माजी विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांतील विद्यार्थ्यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, "निसर्ग म्हणजे केवळ दूरवर दिसणारे डोंगर किंवा समुद्र नव्हे, तर आपल्या सभोवतालचा संपूर्ण परिसर हा निसर्गाचा भाग आहे. आपणही निसर्गाचाच एक घटक असल्याने त्याचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे," असे सांगितले.
कार्यक्रमाला स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य राबते सर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी निसर्ग शाळा हा समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज असलेला उपक्रम असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाल्यामुळे निसर्ग शाळेला महाविद्यालयाचे संपूर्ण सहकार्य लाभणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निसर्ग शाळेच्या शिक्षिका दुर्गा ठिगळे यांनी निसर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाची माहिती देताना पाणथळ जागा, जमिनीचे प्रकार, वनस्पती व बियांची ओळख, पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांचा अधिवास, कातळ सडा आणि जैवविविधता अशा विविध विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून दिला जात असल्याचे सांगितले.
निसर्ग शाळेचे शिक्षक स्वप्निल गोसावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत "साप दूध पितो की उंदीर खातो?","आपल्या भागात कोणकोणती पिके घेतली जातात?" अशा सोप्या पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवली. अशा प्रश्नांची उत्तरे शोधत निसर्ग समजून घेण्याची प्रक्रिया निसर्ग शाळेत घडवली जाते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि हिमांशू लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध निसर्गभ्रमंती, अभ्यासदौरे आणि उपक्रमांचे निवडक छायाचित्रे पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल बांदकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देत पालकांना संस्थेच्या तसेच इकोमेट्सच्या सदस्यांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या प्रत्येक निसर्ग शाळेच्या उपक्रमात प्रशिक्षित टीम सदस्य सोबत असतील, याचीही त्यांनी पालकांना ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी चारुशीला देऊलकर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

