प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा : मालवण नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधात मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
नगरपरिषदेच्या पथकाने भाजी विक्रेते, फळ विक्रेते, अन्य दुकाने तसेच इतर विविध लहान-मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना अचानक भेटी देऊन कसून तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याचे आढळून आले.
प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार व्यावसायिकांवर पथकाने तात्काळ दंडात्मक कारवाई केली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान एकूण ६,६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच जप्त केलेले प्लास्टिक जप्त करून संबंधितांना कडक इशारा देण्यात आला.
केवळ दंडात्मक कारवाई करणे हा नगरपरिषदेचा उद्देश नसून, शहर प्लास्टिकमुक्त करणे हे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळावा. कापडी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा. असे आवाहन पालिका प्रशासनाने केले.
ही मोहीम मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्रीमती संध्या गवळी व स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी केले. या मोहिमेत नगरपरिषदेचे मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत तपासणी आणि जनजागृतीचे काम बजावले.
मालवण शहर संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे आणि अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिक, पर्यटक आणि व्यापाऱ्यांनी 'सिंगल युज प्लास्टिक'चा वापर पूर्णपणे टाळावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधात मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई
