स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल
मंगेश नलावडे | मालवण, प्रतिनिधी : कोळंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ वा वित्त आयोग निधीतून गावातील महिलांसाठी एलईडी बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना एलईडी बल्ब तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता यावा, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनता यावे, या उद्देशाने ग्रामपंचायतीमार्फत एलईडी बल्ब निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री (मशिन्स) उपलब्ध करून देण्यात आली. सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर तसेच सदस्य यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ सानिका पाटकर, समीक्षा धुरी, सेजल पवार, चैतन्य पाटकर, अनिता आंगणे, दीक्षा ढोलम, अश्विनी कुर्ले, कांचन धुरी आणि प्रिया पवार. यांनी घेतला. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळाली असून, स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मितीला चालना मिळत आहे.


