मालवण नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी निघाली एक दिवसीय सहल
स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या संकल्पनेतून आदर्शवत उपक्रम...
आपुलकी आणि एकोपाच्या भावनेने कर्मचारी भारावले
मालवण : मालवण शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सेवा बजावणाऱ्या मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका निना मुंबरकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहिली.

रोजच्या धावपळीच्या आणि कष्टाच्या कामातून काही काळ विरंगुळा मिळावा, एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय सहलीमध्ये नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग कर्मचाऱ्यांनी अधिकारी लोकप्रतिनिधी यांसोबत अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला. रोजच्या कामाचा ताण बाजूला ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. सहलीदरम्यान विविध मनोरंजक खेळ आणि अनौपचारिक गप्पागोष्टींचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदीमय झाले होते.

आम्ही सर्व एक कुटूंब असून एकोप्याची भावना अधिक दृढ असताना हा उपक्रम निश्चितच प्रेरणादाई ठरेल. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वात मोठा वाटा आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्या कष्टाचा आदर राखत, त्यांना कामातून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी सभापती पूनम चव्हाण यांचे विशेष आभार मानले.
▪️अमित खोत | मालवण

