देवबाग शाळा नं. 1 येथील पालकांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : देवबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे समायोजनाने नियुक्त झालेले पदवीधर शिक्षक यांना शाळेत कायम ठेवण्यात यावे. "गेली दोन वर्षे आम्ही शिक्षण विभागाला सहकार्य केले, मात्र आता नियुक्त झालेल्या शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत प्रशालेतून अन्य शाळेत हलवू देणार नाही," असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला आहे.
देवबाग संतप्त पालकांनी मालवण पंचायत समितीत धडक देत आपली भूमिका मांडली. यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिणी पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय माने, सरपंच उल्हास तांडेल आणि सहदेव साळगावकर यांच्यासह देवबाग येथील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवबागचे सरपंच उल्हास तांडेल, सहदेव साळगांवकर व पालकांनी बैठकीत भुमिका मांडताना सांगितले, गतवर्षी पहिली ते सातवीच्या वर्गांसाठी शाळेत शिक्षक उपलब्ध नव्हता. दोन वर्षे केवळ एका शिक्षकावर शाळेचा गाडा सुरू होता, तरीही ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला पूर्ण सहकार्य केले. आता कुठे कार्यालयीन आदेशान्वये पदवीधर शिक्षककांची येथे नियुक्ती झाली आहे. ते रुजू झाल्यापासून अत्यंत उत्तम प्रकारे अध्यापनाचे काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला अधिकारी फोन कशासाठी करत आहेत? हे कितपत योग्य आहे?" असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला.
ग्रामस्थांच्या भावनेला पाठिंबा देत सरपंच उल्हास तांडेल यांनी प्रशासनाला सांगितले "संबंधित शिक्षकाची रितसर प्रशासकीय आदेशाने नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे या निर्णयात आता कोणताही बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आम्ही खपवून घेणार नाही, आता कोणतीही तडजोड होणार नाही," असे सरपंच तांडेल यांनी स्पष्ट केले.
शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवबाग नं. १ या शाळेला मोठा इतिहास आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लक्षात घेता पदवीधर शिक्षकाची नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी. जर राजकीय किंवा प्रशासकीय दबावापोटी या शिक्षकाना इथून अन्य शाळेत बदली करण्याचा प्रयत्न झाला, तर देवबागवासीय तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
▪️अमित खोत, मालवण

नियुक्त झालेल्या शिक्षकांची शाळेतून बदली नको!
