दातृत्वाचे कौतुक
मालवण | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी नेहमीच समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत असतात. याचाच प्रत्यय नुकताच मालवण तालुक्यातील पराड येथे आला आहे. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, पराड येथील विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्ती आणि संस्थेच्या माध्यमातून जवळपास २८ ते ३० हजार रुपये किमतीच्या मोफत शैक्षणिक साहित्याचे अत्यंत उत्साहात वितरण करण्यात आले.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पवित्र स्मृतीस आदरांजली
डॉ. सरस्वती मंगेश रेगे (जन्मदिनांक : १५ जून १९२६) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून, श्री. प्रकाश द्वारकानाथ रांगणेकर यांच्याकडून आणि श्री. नवीन पेडणेकर यांच्या माध्यमातून पराड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये साधारण १५ ते १८ हजार रुपये किमतीच्या खालील वस्तूंचा समावेश आहे. ३० नग आकर्षक टिफीन डब्बे, ३० नग सुंदर पाणी बॉटल्स, ३० नग कंपास पेट्या, ३० नग पेन्सिल सेट्स, ६० प्रति मोठे रजिस्टर्स (वह्या), केशव संस्थेकडून ३० शालेय दप्तरांचे वाटप.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, श्री. देवीलाल पुरोहित यांच्या 'केशव संस्था' यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना ३० अत्यंत सुंदर आणि दर्जेदार शालेय दप्तरांचे (School Bags) देखील मोफत वितरण करण्यात आले. हे सर्व साहित्य पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
शाळा व्यवस्थापनाकडून मनःपूर्वक आभार
एकूण २८ ते ३० हजार रुपयांचे हे सर्व साहित्य ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती, शाळा पराड यांनी सर्व देणगीदार, केशव संस्था आणि विशेष परिश्रम घेणारे श्री. नवीन पेडणेकर सर यांचे मनापासून आभार मानले आहेत. या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडून कौतुक
मागील वर्षात पराड शाळेने केलेला शाळेचा कायपालट आणि शाळेचा शतक महोत्सव तसेच शाळेच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश याचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी सोबत कट्टा बीट विस्तार अधिकारी श्री. सावंत सर उपास्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

पराड शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप...
