मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी म्हणून परागिनी पाटील यांनी पदभार स्वीकारला. पंचायत समिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण आणि उपसभापती घनश्याम झाड यांनी सौ. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
परागिनी पाटील यांनी यापूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा तालुक्यातील ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण,सहायक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत,लक्ष्मण हांडे, वैभव पारकर,व्ही.के.जाधव,तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आत्माराम परब यांच्यासह पंचायत समितीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर सौ. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विविध विकासकामांचा व योजनांचा संक्षिप्त आढावा घेतला.

मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी परागिनी पाटील यांची नियुक्ती
