महिलांनी केली वडाच्या वृक्षाची पुजा
मंगेश नलावडे | मालवण :- मालवण शहरासह तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाजवळ गर्दी करत विधीवत पूजा केली. वडाच्या झाडाला हळद-कुंकू, फुले व नैवेद्य अर्पण करून धागा गुंडाळत प्रार्थना केली.
मालवण शहरातील विविध मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या वृक्षांजवळ महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी सामूहिक पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी वटसावित्रीची कथा श्रवण करून पारंपरिक पद्धतीने व्रताचे पालन केले.
यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. काही सामाजिक संस्था व शाळांनी वडासह विविध वृक्षांचे रोपण करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.
श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या वटपौर्णिमा उत्सवामुळे मालवण परिसर दिवसभर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने न्हाऊन निघाला.

मालवणात वटपौर्णिमा उत्साहात...
