मालवण टोपीवाला हायस्कुल येथील साक्षी रावराणे यांचा जिल्ह्यात पाचवा क्रमांक
मालवण | प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत तब्बल ७ गुणांची वाढ झाल्याने अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील विद्यार्थिनी कुमारी साक्षी संजय रावराणे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुणवाढीनंतर ५०० पैकी ४९६ गुण (९९.२० टक्के) मिळाले असून त्यांनी मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यातही पाचवा क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
यापूर्वी ८ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात साक्षी यांना ५०० पैकी ४८९ गुण (९७.८० टक्के) मिळाले होते. त्या गुणांच्या आधारे त्यानी मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. मात्र स्वतःच्या अभ्यासावर व परीक्षेतील कामगिरीवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज केला होता.
फेरतपासणीनंतर मराठी विषयात २ गुण आणि विज्ञान-१ विषयात ५ गुण अशी एकूण ७ गुणांची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचे एकूण गुण ४९६ (९९.२० टक्के) झाले आहेत.
भाषा विषयांमध्ये साक्षी यांनी विशेष प्रावीण्य मिळवत मराठीत ९७, इंग्रजीत ९८ आणि संस्कृतमध्ये ९९ गुण मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
साक्षी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच समाजातील विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
▪️अमित खोत | मालवण

फेरतपासणीत ७ गुणांची वाढ
