तुम्ही सर्वजण उगवते तारे, सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासात सर्वांचे योगदान महत्वाचे
मालवण येथील महायुती, भाजपा कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद
मालवण माझ्यासाठी आंनदाचा आणि शुभ मुलुख
राणे साहेब हीच आमची ऊर्जा : कार्यकर्त्यांनीही व्यक्त केल्या उत्स्फूर्त भावाना
मालवण | प्रतिनिधी : जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते खासदार या प्रवासात दहा विविध पदे भूषवली. याचे सर्व श्रेय जनतेचे आणि सहकारी व कार्यकर्ते यांचे आहे. मी आजही स्वतःला जनतेचा सेवक व सर्वसामान्य कार्यकर्ता मानतो. माझ्या कोकणातील माझे सहकारी कार्यकर्ते यांना भेटल्यावर वेगळी ऊर्जा प्राप्त होते. आपल्या सर्वांशी संवाद साधावा या भावनेतून आपल्याला भेटलो. मालवण बाबत बोलायचे तर हा मुलुख नेहमीच माझ्यासाठी आनंदाचा शुभ राहिला आहे. अश्या भावना माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे व्यक्त केल्या. दरम्यान, उपस्थित लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही सर्वजण उगवते तारे आहात. जनतेचे सेवक म्हणून जनतेची सेवा करत रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असताना प्रत्येकाचे योगदान त्यात महत्वाचे आहे. असा मौलिक सल्ला खासदार नारायण राणे यांनी उपस्थितांना दिला.

खासदार नारायण राणे यांनी मालवण येथील महायुती व भाजप कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. महायुतीच्या कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, उमेश नेरुरकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुका प्रमुख मंदार लुडबे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राजू बिडये, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, महेश कोयंडे, मधुरा तुळसकर, भाऊ मोरजे, मोहन वराडकर, महेश सारंग, बाळू तारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, विलास हडकर, शहर प्रभारी पंकज सादये, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, संतोष गांवकर, उपतालुकाध्यक्ष केदार झाड, महिला बालकल्याण सभापती भाजपा शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, जिप सदस्या क्षमा हडकर, युवामोर्चा शहराध्यक्ष नगरसेवक ललित चव्हाण, महिमा मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, अमृता फाटक, अशोक तोडणकर, उपसभापती घनश्याम झाड, रोहेश गांवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार नारायण राणे म्हणाले, राजकारणात तब्बल ६० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असताना आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांसारखी सर्वोच्च पदे भूषवूनही मी स्वतःला नेहमीच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा सेवक मानत आलो आहे. पदाचा कधीही गर्व न बाळगता सातत्याने लोकांची सेवा करत राहा, जनतेचे प्रेम नक्कीच मिळेल," असा मोलाचा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मालवण हा आपल्यासाठी नेहमीच 'शुभ' मतदारसंघ राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगत कार्यकर्त्यांना लोकसेवेचा वसा चालू ठेवण्याचे आवाहन केले. मालवणात आल्यावर मला प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन मिळते अशी माझी भावना आहे. या भावनेतून मी आज सदिच्छा भेट दिली आहे. कोकणचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अधिकाधिक विकास व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. यादृष्टीनेच मी राजकारणात सक्रिय राहिलो आहे. माझे राजकारणातील हे दहावे पद आहे. आमदार झालो, सभागृहात गेलो, अनेक मोठी पदे मिळाली, पण मी नेहमी सरळ मार्गाने चालत राहिलो. लोकांची मदत करणे आणि सहकार्य करणे हीच माझी कार्यपद्धती असून, माझ्या डिक्शनरीत 'नाही' हा शब्दच नाही.
कार्यकर्त्यांना वाचन आणि अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या लोकसेवेचे त्यांनी कौतुक केले. निलेश राणे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते सर्वांसमोर आहे. मागील अधिवेशनात व आताही त्यांनी केलेली भाषणे बघा. वाचन अभ्यासू पणा असला की लोकसेवा व कामाची दिशा मिळते. कार्यकर्त्यांनीही संयम आणि अभ्यासू वृत्ती अंगी बाळगली पाहिजे, असे राणे म्हणाले.
येत्या काळात आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही हाक मारा, तुमच्या मदतीला मी तत्पर असेन, अशी ग्वाही देत खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्ता सामंत, ममता वराडकर, पुनम चव्हाण, मिलिंद कुलकर्णी, धोंडी चिंदरकर, विलास हडकर, अन्वेषा आचरेकर यांनी विचार मांडले. खासदार नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव केला. खासदार नारायण राणे हीच आमची ऊर्जा असल्याचे त्यांनी सांगितले.
▪️अमित खोत, मालवण

