मालवण : केंद्रशाळा मसुरे नंबर 1, ता. मालवण येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक खऱ्या निवडणुकीच्या धर्तीवर मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर, पदवीधर शिक्षक गणेश घुगे, उपशिक्षिका सुजाता वेडेकर, पदवीधर शिक्षक दर्शन हजारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, सदस्य हेमलता दुखंडे, संस्कृती बांदीवडेकर, नाझिया शेख आदी मान्यवर पालक उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदासाठी कुमारी मानवी शिंगरे व कुमारी मानसी मुळये या दोन उमेदवार रिंगणात होत्या. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी व मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी ईव्हीएमद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने खऱ्या मतदानाप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका तासात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीअंती मुख्यमंत्रीपदी कुमारी मानवी शिंगरे तर उपमुख्यमंत्रीपदी कुमारी मानसी मुळये हिची निवड झाली. मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री मानवी शिंगरे व उपमुख्यमंत्री मानसी मुळये यांचे मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर, शा.व्य.स. अध्यक्ष सन्मेष मसुरेकर व सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले.
▪️अमित खोत | मालवण

केंद्रशाळा मसुरे नं. 1 मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न
