ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आचरा ग्रामपंचायत आक्रमक भूमिकेत
आचरा : गावातील रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी वर्षभर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा जनावरांमुळे अपघात घडत असून ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आचरा ग्रामपंचायतीने आता कडक भूमिका घेत मोकाट जनावरांच्या प्रश्नावर थेट पशुपालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी पशुपालकांच्या घरी भेटी देत सायंकाळी गुरे गोठ्यात न आढळता रस्त्यावर मोकाट फिरताना दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.
ग्रामपंचायतीने यापूर्वीच तीन महिन्यांपूर्वी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करून मोकाट जनावरे सोडू नयेत, असे आवाहन केले होते. काही काळ परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुन्हा पशुपालकांकडून निष्काळजीपणा वाढल्याने गावातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी गुरांचा मुक्त संचार सुरू झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर गुरे आल्याने अपघात घडण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यामुळे ग्रामपंचायतीने केवळ सूचना देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन जबाबदारीची जाणीव करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह इतर कायदेशीर उपाययोजनाही राबविण्यात येणार असल्याचे संकेत ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहेत.
या मोहिमेत उद्योजक जयप्रकाश परुळेकर यांच्यासह उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य, मुझफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, योगेश गावकर, अनुष्का गांवकर, किशोरी आचरेकर, पुर्वा तारी, श्रृती सावंत, सायली सारंग, सारीका तांडेल, यांसह आचरा पशुवैद्यकीय अधिकारी, मिलिंद कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच , पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांसह अन्य आदी सहभागी झाले होते.

