जत्रोत्सव नियोजन बैठक :
जत्रोत्सवास भाविक-भक्तांनी उपस्थतीत राहावे बिळवस ग्रामस्थांचे आवाहन.....!
मंगेश नलावडे | मालवण | प्रतिनिधी : भक्ताच्या हाकेला व नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर ख्याती असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यात होणारा सातेरीचा जत्रोत्सव यावर्षी रविवार २६ जुलै रोजी होणार आहे. असल्याची माहिती सातेरी देवस्थानच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव जत्रा म्हणून या बिळवस श्री सातेरी देवी जलमंदिरची ख्याती आहे.

मृग नक्षत्राच्या पाचव्या दिवशी शेतीवाडीच्या लागवडीसाठी देवी समोर अखंड नारळ ठेवून देवीला साकडे घालण्यासाठी संपूर्ण गाव सकाळच्या वेळी मंदिरामध्ये जमा होतो. गाव रहाटीची कामे झाल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र बसून आषाढ महिन्यामध्ये होणाऱ्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित करतात, यावर्षीचा जत्रोत्सव रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी साजरा करण्याचे गावातील मानकरी,विश्वस्त व ग्रामस्थ यांनी निश्चित केले. यावेळी गावातील मानकरी श्री.मोहन वसंत पालव,श्री. विद्याधर विनायक पालव,श्री. विश्वनाथ काशिराम पालव, श्री. संतोष दिगंबर पालव, तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.आनंद गोपाळ पालव, उपाध्यक्ष श्री. महादेव हरिश्चंद्र पालव, चिटणीस श्री. सदाशिव नारायण पालव, खजिनदार श्री. सुनिल मदन पालव सह विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

मालवण बिळवस या गावचा सर्वात मोठा यात्रोत्सव आषाढ महिन्यात असतो. यात्रे दिवशी गावातले चाकरमानी, माहेरवासीणी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त या यात्रे दरम्यान देवीच्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी न चुकता येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला निळ घालतात. एका भाड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून ही नीळ बनवली जाते. नंतर देवीचा पेटारा वाजत-गाजत मानकरी मंडळींकडून मंदिरात आणला जातो. देवीला वस्त्रालंकार नेसवून, मुखवटा घातला जातो. यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोब-याच्या वाटीत पेटता काकडा (दिवा) तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला गावातल्या प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो.

मानकरी मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरीतीनुसार गा-हाणी होतात. मग ओट्या भरण्यास प्रारंभ होतो.संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. कोकण प्रांतातील एकमेव जलमंदिर म्हणून या बिळवस श्री सातेरी जलमंदिराची ख्याती जगभर पसरली आहे. यामंदिरात होणारी आषाढ यात्रा म्हणजे दूरवर पसरलेल्या भाविकांसाठी देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं एकत्र येण्यासाठी एक मोठी पर्वणीच असते. जत्रोत्सवादिवशी सकाळपासून उत्सव सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालतो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील लाखो भाविक तसेच राजकीय नेते, पुढारी जत्रोत्सवाला उपस्थित राहतात.

