जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण मोहीम
मालवण | प्रतिनिधी : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त मालवण नगरपरिषद परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर, मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश यां निमित्ताने दिला.

यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर,नगरसेवक महेश कांदळगावकर,महानंदा खानोलकर यांसह पालिकेचे अधिकारी,कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती यावेळी होती.
मालवण शहराला अधिक हरित, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत पालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सभापती व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून व रोपट्याला पाणी घालण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा आणि सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चा फलकही प्रदर्शित करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष खड्डे खणून व रोपे लावून श्रमदान केले. तसेच पालिकेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनीही नवीन लावलेल्या झाडांना पाणी घालत या उपक्रमात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावणे काळाची गरज: नगराध्यक्षा
वृक्षारोपण प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या "केवळ पर्यावरण दिन साजरा करून न थांबता, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मालवण नगरपरिषद शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. 'माझी वसुंधरा' आणि 'स्वच्छ भारत अभियान २.०' अंतर्गत आपण आपले प्रभाग आणि परिसर पर्यावरणपूरक बनवले पाहिजेत. असे नगराध्यक्ष यांनी सांगितले.

