जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समितीचे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : 'फिट इंडिया मिशन' अंतर्गत नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी आणि जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून येथे रविवार ७ जून रोजी विशेष 'संडे ऑन सायकल' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत या रॅलीचे नियोजन करण्यात आले असून, याद्वारे "अधिक तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत" घडवण्याचा मुख्य उद्देश आहे. अशी माहिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांनी दिली.
या भव्य सायकल रॅलीमध्ये पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत, बचत गट सदस्य, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी 'फिट इंडिया मिशन'च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://fitindia.gov.in/world-bicycle-day) लिंकद्वारे केली जाणार आहे.
ही सायकल रॅली ७ जून रोजी सकाळी ८.१५ ते ९.१५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. रॅलीची सुरुवात पंचायत समिती मालवण येथून होणार असून ती मालवण पोस्ट ऑफिस, भरड नाका, बसस्थानक, देऊळवाडा पूल (सागरी महामार्ग), कोळंब पूल ते फोवकांडा पिंपळ आणि पुन्हा पंचायत समिती अशी काढण्यात येणार आहे.
या सायकल रॅलीच्या माध्यमातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीचाच नव्हे, तर आरोग्यविषयक जनजागृती आणि पर्यावरणपूरक स्वच्छतेचा संदेशही संपूर्ण मालवण शहरात प्रसारित केला जाणार आहे. रॅलीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत राहावी आणि हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

'संडे ऑन सायकल' उपक्रम
