मसुरे : प्रतिनिधी
मसुरे टोकळवाडी येथील रहिवासी महेश अच्युत खोत वय 53 याचे मंगळवारी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी दुपारी मर्डे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महेश खोत याला बंटी या टोपण नावाने ओळखले जात होते. मर्डे ग्रामपंचायत मध्ये लिपिक या पदावर तो कार्यरत होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शूटिंग बॉल खेळामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने होलमसुरा संघाचे नेतृत्व केले होते.
महेश हा उत्कृष्ट क्रिकेटपटू ,उत्कृष्ट नाट्यकलाकार, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता. शालेय आणि कॉलेज जीवनात भालाफेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत त्याने यश मिळवले होते. शांत संयमी आणि सर्वांना मदत करणारा अशी त्याची गावामध्ये ओळख होती. सुंदर हस्ताक्षर मुळे अनेक शासकीय कामांमध्ये त्याच्या लेखणीचा वापर केला जात होता. पंचायत समितीच्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने आपल्या खेळाची चमक दाखवली होती. भक्तिमार्ग सुद्धा त्याने जोपासला होता.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, भावजय,काका, काकी, मेहुना,चुलत भाऊ, बहिणी, असा मोठा परिवार असून मसुरे वाचन मंदिर चे ग्रंथपाल विजय गिरकर यांचा तो भाऊजी तर इलेक्ट्रिकल इंजिनियर सायोज्यता खोत यांचे ते वडील आणि निवृत्त शिक्षक भाऊ खोत यांचे बंधू होत.

मर्डे ग्रामपंचायत लिपिक महेश उर्फ बंटी खोत यांचे निधन..
