प्रशासनाचे वराती मागून घोडे | नागरिकांचा संताप
युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांची तीव्र नाराजी
मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी या कुत्र्यांच्या झुंडी नागरिकांच्या अंगावर येतात. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत. देऊळवाडा भागातील एका महिलेचा कुत्र्याने चावा घेतल्यावर त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा चावा कुत्र्याने घेतल्या यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मालवणातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची समस्या गेले काही वर्षे जैसे थे असून नगरपालिकेकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, नगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका ठाकरे शिवसेना युवासेनेचे मालवण उपशहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी करत कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले वाढत असल्याने नागरपालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी संतप्त मागणी केली आहे.
नगरपालिकेने काही वर्षापूर्वी शहरातील कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्रे निर्बीजीकरण मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेत कोणतेही सातत्य ठेवण्यात आलेले नाही. यामुळे मालवण शहरातील कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

मालवण शहरात कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवत तसेच नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. नागरिकांवर कुत्र्यांकडून जीवघेणे हल्ले झाल्या नंतर प्रशासनाने श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, औषधउपचार, अधिवासात सोडणे याबाबत निविदा काढली असून 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही निविदा उघडली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
एकूणच गेले काही महिने मालवण शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढत असताना नागरिकांवर हल्ले होण्याची वाट प्रशासन पाहत होते का? असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला असून प्रशासनाचा हा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असा हा प्रकार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

