कुंभारमाठ ग्रामपंचायतीने वेधले मालवण तहसील प्रशासनाचे लक्ष
मालवण : कुंभारमाठ तलाठी कार्यालय हे मागील सहा ते आठ महिने बंद आहे. तसेच कार्यालयात भरती करण्यात आलेला कोतवाल अद्याप पर्यंत सजावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
मौजे कुंभारमाठ गावचे तलाठी कार्यालय हे कुंभारमाठ, घुमडे व कातवड तीन गावांचे एक कार्यालय आहे. सदर तलाठी कार्यालय गेले सहा ते आठ महिने बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, तसेच कार्यालयीन कामासाठी मालवण येथील तलाठी कार्यालयात जावे लागत असल्याने कुंभारमाठ, घुमडे व कातवड येथील जेष्ठ ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी वारंवार ग्रामपंचायतकडे येत आहेत. मंगळवार 23 जुलै रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत याबद्दल मुद्दा उपस्थित केला होता. तसेच कुंभारमाठ तलाठी कार्यालयामध्ये भरती करण्यात आलेले कोतवाल भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून अद्याप पर्यंत सजावर हजर झालेले नाही. त्यावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत नाराजी व्यक्त केली होती, पत्र व्यवहार केलेला आहे.
मात्र अद्याप तलाठी कार्यालय बंद अवस्थेत आहे. याबाबत ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत आहेत. तरी याबाबत योग्य ती कारवाई करून कुंभारमाठ तलाठी कार्यालय पुर्ववत चालू ठेवणे, तसेच कोतवाल यास सजावर हजर राहणे बाबत अवगत करावे, असे विनंती निवेदन कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या वतीने मालवण तहसील कार्यालयात देण्यात आले आहे.
यावेळी सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रा.पं.सदस्य प्रमोद भोगावकर, सौ सोनाली डिचवलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच विनोद भोगावकर उपस्थित होते.

