नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी स्त्रीशक्तीचा सन्मान सोहळा ठरला विशेष
मालवण : सिंधुदुर्गच्या सामाजिक पटलावरील एक आघाडीचे महिला नेतृत्व मालवण येथील सामाजिक कार्यकर्ता सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विशेष सन्मान सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांच्या वतीने घटस्थापना अर्थात नवरात्री जागर सोहळ्याच्या पहिल्या दिवशी झाला. शिल्पा खोत यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा सन्मान सोहळा त्यांच्या सोबतीने सामाजिक कार्यात असलेल्या प्रत्येक स्त्रीशक्तीचा सन्मान ठरला.
विविध पारंपारिक गीते म्हणत आणि त्याच्या तालावर विविध प्रकारच्या फुगड्या घालून सिंधुदुर्गातील फुगडी लोककलेचा वारसा जोपासत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात फुगडी संमेलन संपन्न झाले. पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे लोककला पर्यटन या संकल्पनेवर आयोजित पर्यटन सप्ताहा अंतर्गत महाविद्यालय आणि स्वराज्य ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या फुगडी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटन सप्ताह साजरा करणारे आणि आणि फुगडी संमेलनाचे आयोजन करणारे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.
या फुगडी संमेलनाचे उदघाटन स्वराज्य ढोल पथकाच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्वराज्य ढोल पथकाच्या गगनभेदी ढोल वादनाने संमेलनाची सुरुवात झाली.
यावेळी महाविद्यालयातर्फे सौ. शिल्पा खोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर त्यांच्या हस्ते फुगडी कलाकार सौ. ऋणाली चव्हाण, सौ. दिव्या साळकर, फुगडी संमेलनाच्या सूत्रसंचालक सौ. संस्कृती बांदकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. उज्वला सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी सौ. शिल्पा खोत म्हणाल्या, माझा आज झालेला सन्मान हा येथील सर्व स्त्री शक्तीचा सन्मान आहे. सिंधुदुर्गसह कोकणात फुगडी ही पूर्वांपार चालत आलेली लोककला आहे. अशी लोककला जोपासण्यासाठी सिंधुदुर्ग महाविद्यालयाने आयोजित केलेले फुगडी संमेलन एक कौतुकास्पद उपक्रम आहे. पर्यटन सप्ताह साजरे करणारे राज्यातील पाहिले कॉलेज आहे. अशा उपक्रमासाठी आपले व स्वराज्य ढोल पथक संघटनेचे नेहमी सहकार्य लाभेल, असेही त्या म्हणाल्या. मला येथील सर्व माऊली, भगिनी यांची साथ लाभली. सर्व माऊली, भगिनी हिच समाजाची ताकद आहेत. असे सांगत सर्व स्त्रीशक्तीचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी पर्यटन सप्ताहनिमित्त राबविलेल्या उपक्रमाची माहिती देताना या फुगडी संमेलनास शुभेच्छा दिल्या. तसेच शिल्पा खोत यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत सामाजिक कार्याचे कौतुक केले. प्राध्यापक सुमेधा नाईक व प्राध्यापक उज्वला सामंत यांनीही शिल्पा खोत कार्याचा शब्दसुमनांनी गौरव केला.

यावेळी उपस्थित महिला व तरुणींनी विविध पारंपारिक गाणी म्हणत त्याच्या तालावर विविध फुगड्या सादर करत या संमेलनाचा आनंद लुटला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, स्नेहल भगिनी मंडळाच्या सदस्य महिला, विद्यार्थिनी तसेच इतर महिला व तरुणी उपस्थित होत्या.

