आंदोलनाचा इशारा
हरित न्यायाधिकारकडे तक्रार करणार असल्याचे केले स्पष्ट
तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : कालावल खाडी पात्रात हडी पाणखोल बेट परिसरात तसेच आजूबाजूला मोठया प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरु आहे. बेट खचून धोकादायक बनले आहे. तसेच वाळू उपसा करणारे कामगारही धिंगाणा घालत असतात. महिला वर्ग असूरक्षित बनला आहे. कामगार राहात असलेल्या झोपड्या मध्ये अनधिकृत पणे लाईट घेण्यात आली आहे, त्याबाबतही आमची तक्रार आहे. यावर त्वरित कारवाई करावी. अनधिकृत वाळू उपसावरही कारवाई व्हावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू. असा इशारा ग्रामस्थांनी मालवण तहसीलदार वर्षा झालटे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
दरम्यान याबाबत मेरीटाईम बोर्ड व जिल्हा प्रशासनान यांचेही लक्ष वेधले जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील हडी कालावल खाडी पात्रात अवैध वाळू उपसा बाबत निवेदन पुजा तोंडवळकर तसेच संतोष मिठबावकर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मालवण तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे.
अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी अनेक परप्रांतातील लोक हे गावामध्ये राहत आहेत. तसेच ग्रामपंचायत नळ योजनेचे पाणी देखील चोरीने वापरले जात आहे. तर वीज वाहिन्यांवरून चोरट्या पद्धतीने वीज वापर सुरु आहे. याची फोटोसह तक्रार वीज वितरण कार्यालयात करण्यात आली आहे. सरपंच यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. असेही सांगण्यात आले.
महसूल यंत्रणा यांना वारंवार कल्पना देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. यंत्रणाची या चोरीच्या वाळू मध्ये आर्थिक बाबींची देवाणघेवाण होत आहे का? याबतही निवेदनात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
तसेच अवैध वाळू वाहतुकीच्या येणाऱ्या वेगवान डंपरमुळे गावातील माणसांना तसेच पाळीव जनावरे यांना देखील धोका निर्माण झाला आहे. तरी योग्य ती दखल घेऊन याबाबत कार्यवाही करावी अन्यथा हडी ग्रामस्थांच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
'तोपर्यंत' वाळू उत्खननासाठी परवानगी देऊ नये….
मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील वाळू उपसा करण्यास गट बी म्हणजेच पाणखोल जुवा व बंडा बेट यांच्यावतीने सदर गटासाठी जोपर्यंत नदी किनारी व बेटांना बंधारा होत नाही तोपर्यंत लिलावासाठी कोणाचेही अर्ज स्वीकारू नये व परवानगी देऊ नये असे मागणी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे. परवानगी दिली, तर याचिका हरित न्यायाधिकार कार्यालयात सादर केले जाईल. प्रसंगी पाण्यामध्ये बसून उपोषण करू असाही इशाराही पाणखोल जुवा येथील संतोष मिठबावकर यांसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

