मालवण : समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आणि नेटफिश संस्थांच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड, दांडी मालवण येथे ट्रॉलर मालकांसाठी टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस (TED) म्हणजेच कासव अपवार्जक साधन विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
मालवण परावाना अधिकारी मुरारी भालेकर व सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कासव अपवार्जक साधन बंधनकारक केलेल्या अधिसूचनेची माहिती व दंड तरतूद याबबद्दल सांगितले.
संतोष कदम यांनी "भारतात टर्टल एक्सक्लुडर डिव्हाईस (TED) चीं रचना, क्षेत्र प्रात्यक्षिक आणि अंमलबजावणी" या विषयावर मराठी भाषेत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले.

ट्रॉलर मालक, सागरमित्र, मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी अशा एकूण 25 जणांनी जनजागृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल MPEDA-नेटफिश संस्थेचे सर्वांनी यावेळी आभार मानले.

प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थित मच्छिमारांना MPEDA-नेटफिशचे लोगो आणि "टेड वापरा, कासव वाचवा" असा संदेश असणारे टि-शर्ट्स चे वितरण करण्यात आले. टेड (TED) विषयी मराठी भाषेत माहितीपत्रके वाटली. नेटफिश संस्था HDC शिवाली कवटकर यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यकाची भूमिका बजावली.

