पोलीस व तहसील प्रशासनास दिले निवेदन | व्यक्त केल्या तीव्र भावना
मालवण : मालवणात आज संतप्त महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत पोलीस व तहसील प्रशासनास निवेदन दिले. कठोर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊ, महिलेला जिवंत जाळणे असे कृत्य करणारा मोकाट सुटला तर आम्ही त्याला जाळून मारू. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा करावी. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावु नये. असा इशाराच यावेळी देण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले, शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवणात बुधवार 25 सप्टेंबर रोजी प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल अशी घटना घडली आहे. खरंतर देशात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत असताना आपल्या मालवण शहरात दिवसा ढवळ्या भर दुपारी भर वस्तीत एका नराधमाने अबलेवर पेट्रोल ओतले व तिला पेटवून दिले.

हे कृत्य करणारा पळून गेला. परंतु तो पळून जाताना त्याने मालवणच्या संस्कृती आणि सभ्यतेला काळिमा फासला. सौ. सौभाग्यश्वरी गोवेकर (पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर) या महिलेवर जो तिच्याच पूर्वाश्रमीच्या पती म्हणवून घेणाऱ्या नराधमाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत यमसदनाला पाठवले, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यापुढे असे नीच कृत्य करण्यास कोणी धजावता नये. यासाठी पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून सर्वपक्षीय महिलांनी नागरिकांनी मालवण तहसीलदार व मालवण पोलीस यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले आहे. पोलिसांनी कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.


महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, अभागी सौ प्रीतीला न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय महिलांनी, नागरिकांनी दत्त मंदिर भरड नाका मालवण येथे एकत्र येऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. सौ. शीतल बांदेकर, सौ अमृता वाळके, सौ. राणी पराडकर, सौ. महीमा मयेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. पूनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सौ. पल्लवी तारी, सौं. पुजा वेरलकर, श्रीम. शर्वरी पाटकर, डॉ. मालविका झांटये, निनाक्षी शिंदे, सोनाली पाटकर, रूपा कुडाळकर, फॅनी फर्नांडिस, दिक्षा लुडबे, मेगल डिसोजा आणि मालवणातील असंख्य महिला भगिनी सहभागी होते.


