वैभववाडी | प्रतिनिधी : अस्वस्थ वर्तमानाची चिकित्सा, फॅसिझम संक्रमणाची सापेक्ष उकल, जात्यांत लोकशाही क्रांतीसाठी व्यापक हाक या तळमळीतून कॉम्रेड अंकुश कदम यांनी लेखन केले असून फॅसीझमचे वादळ या देशाला लपेटून घेत आहे त्याच्या विरोधातील हा त्यांचा हस्तक्षेप आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी केले.
सत्यशोधक समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने कॉम्रेड अंकुश कदम यांच्या हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून या लेख संग्रहाच्या पुस्तक संवाद कार्यक्रमात ढगे बोलत होते.नगर वाचनालायक कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या संवाद कार्यक्रमास प्रा. अनिल फराकटे, कॉ.संपत देसाई, लेखक कॉ.अंकुश कदम कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून स्वाती तेली आदी उपस्थित होते.
बोलताना प्रभाकर ढगे पुढे म्हणाले, सध्याची देशातील स्थिती भयावह आहे. देशाने 360 अंश कोणातील उजवे वळण घेतले आहे. आज आपण पुढे काय होणार याची वाट पाहतोय. देशात वन नेशन वन इलेक्शन सुरू होत आहे. हे लोक भारताला कुठे घेऊन जात आहेत. याची असह्यपणे आम्ही वाट पाहत आहोत. ज्याचा विरोध व्हावा असे वाटत असताना त्याचे नेमके समर्थन करण्याची दारुण परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही गुलामी एन्जॉय करण्यात धन्यता मानतो म्हणून त्यांची प्रतिके आम्हाला हाणून पाडता येत नाहीत. आमची प्रतीके आम्हाला प्रकर्षाने मांडता येत नाही. अशी आजची स्थिती आहे. ज्यांच्या पूर्वजांनी इंग्रजांची हेरगिरी केली. तेच आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत आहेत. दलित चळवळीच्या नेत्यांनी चळवळीचे तीन तेरा वाजवले आहेत. प्रत्येकाने आपली वेगवेगळी चूल मांडली आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. त्यामुळेच आज विचारवंतांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत.
नेतृत्व विकलांग होत आहे,विकले जात आहे. असं संपूर्ण देशातील चित्र आहे. याबद्दल समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता व चीड आहे. मात्र नेतृत्व स्वतःला विकत चालले आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गांधी आणि आंबेडकरांना एकत्र आणल्याशिवाय आजच्या सम्यक चळवळीला योग्य दिशा देता येणार नाही. गांधी आणि बाबासाहेबांमधील मतभेद आपल्याला मान्य करून एकत्र यावेच लागेल अन्यथा प्रत्येकाला आयसोलेट करीत आपल्याला ॲनाकोंडा सारख्या बलाढ्य शत्रूशी लढाई करता येणार नाही, याचे भान आपल्याला असले पाहिजे. आपल्या संस्था, चळवळी यासारख्या गोष्टी गिळंकृत होत आहेत. आमचे नेते,विचारवंत, बुद्धिवादी काय करीत आहेत. हा अतिशय व्यतीत करणारा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांवर तो अंमकावादी,तमकावादी असा शिक्का मारण्यापेक्षा त्यांच्यामध्ये समन्वय केला पाहिजे. सद्याच्या परिथितीवर भाष्य करीत लेखक अंकुश कदम यांनी जोरदार हस्तक्षेप केला आहे. असे सांगितले. तर कॉ. संपत देसाई म्हणाले, जातीच्या प्रश्नांना केंद्र
स्थानी ठेवून भांडवलशाहीतील बदलते जात वास्तव या पुस्तकात कॉम्रेड अंकुश कदम यांनी मांडले आहे एक जन लढ्यातील कार्यकर्त्यांचे चिंतन पुस्तकाच्या पानापानात त्याचा सच्चेपणा दिसत आहे. अंकुश कदम केवळ तत्वज्ञान सांगत नाही तर ते जैविक बुद्धिजीवी आहेत.पुस्तकाची भाषा सिद्धांताची भाषा असली तरी ती आवश्यक आहे. बदलत्या जात वास्तवाची सम्यक वास्तव दाखवणारी आहे. असे सांगितले. तर प्रा. फराकटे म्हणाले, हे दशक हे अधपथनाचे दशक आहे.समतेच्या तत्त्वांची वासलात लावणारे दशक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी झाले आहे. आपल्याला भूमिका आहे की नाही. अशी परिस्थिती आहे या पुस्तकातील अंश अंश तळमळ विचारांची पेरणी आवाहन प्रत्येकाला खूणवत आहे.या परिस्थितीत हस्तक्षेप करीत या आव्हानाचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. यावेळी अंकुश कदम यांनी या लेख संग्रह कोरोनाच्या काळात लिहिला असून यामागची भूमिका विषद केली. तर अध्यक्ष स्वाती तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्तावना महेश पेडणेकर यांनी सूत्रसंचलन संतोष पेडणेकर, यांनी केले.यावेळी कवी अजय कांडर,गौतम तांबे, शरद कांबळे, जितेंद्र पेडणेकर,सुदीप कांबळे, प्रदीप तांबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

