युवा सेनेची धडक ; ताडपत्री आंदोलन
कुडाळ : कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामला एक महिना पण झाला तोपर्यंत छत गळायला लागले आहे. ठाकरे सेना युवा सेनेने या संदर्भात आज सायंकाळी कुडाळ रेल्वे स्टेशनवर जाऊन ताडपत्री भेट देत अनोखे आंदोलन छेडले.
कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करीत या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत श्री गणेश चतुर्थीपूर्वी पार पडला. मात्र याला अद्याप एक महिनाही पुर्ण झाला नाही तोवर मुख्य प्रवेशद्वारावर तिकीट काऊंटर समोर नव्याने करण्यात आलेल्या छताला पावसाने गळती लागली आहे. छताला ठेवलेल्या लाईट लॅम्पमधून सारखे पाणी गळत आहे. यामुळे छत तसेच इलेक्ट्रॉनिक वायरिंगलाही धोका निर्माण झाला आहे. अल्पावधीतच छताला गळती लागल्याने याही कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या विरोधात बुधवारी सायंकाळी ठाकरे शिवसेना युवासेनेने महायुती सरकारला ताडपत्री भेट देत तेथे अनोखे आंदोलन छेडले. गळती लागलेल्या ठिकाणी ताडपत्री बांधून युवासेनेने आंदोलन छेडत, महायुती सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.
युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, उपतालुकाप्रमुख विनय गावडे व सागर भोगटे, सचिन केतन शिरोडकर, शहर समन्वयक अमित राणे, गुरू गडकर, गोट्या चव्हाण, अनिकेत आंदुर्लेकर, केदार धुरी, रामा कांबळी, भूषण गावडे, दिनेश कदम, गणेश गावडे, प्रसाद गावडे, संदेश सावंत, राहूल नाईक आदींसह युवासैनिक उपस्थित होते.

