पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांचे आयोजन
मालवण : पर्यटन व्यावसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त 27 सप्टेंबर रोजी खुल्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
देवबाग मत्स्यगंधा समर्थ थिएटर येथे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक ५,००० रुपये, द्वितीय क्रमांक ३,००० रुपये , तृतीय क्रमांक २,००० रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच चवदार सोलकडी बनवणाऱ्या स्पर्धकांना देखील भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी बनवलेला खाद्य पदार्थ हा मालवणी व्हेज अथवा नॉनव्हेज असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी पदार्थ घराकडून तयार करून स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळेत सजवून ठेवायचा आहे. त्यासोबतच जो पदार्थ प्रेझेंट केला आहे त्याची माहिती उदा. साहित्य, कृती,गुणधर्म इत्यादी माहिती सविस्तर लिहून आणायच्या आहेत. पदार्थ सजावटी साठी नैसर्गिक साधनांचा वापर केलेला असणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्लास्टिक, मेटल, स्टील, याचा वापर नसावा, तसेच स्पर्धकांनी खाद्य पदार्थ हा स्वखर्चाने बनवून आणायचा आहे.

स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी प्रथम नोंदणी आवश्यक आहे. पहिल्या 50 स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास महासंस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मिथिलेश मिठबांवकर ९४२२५८४३६३ यांच्याशी संपर्क साधावा. अशी माहिती देण्यात आली आहे.


