नारुर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
दोन्ही गावचा संपर्क तुटला
कुडाळ : कुडाळ तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे पणदूर आणि वेताळ बांबर्डे ही दोन गावे जोडणारा ब्रीज कम बंधारा वाहून गेला. ही घटना आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पणदूर गावातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पणदूर आणि वेताळ बांबर्डे गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना ७ ते ८ किमी अंतर पूर्ण करून जावे लागणार आहे.
या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कै पुष्पसेन सावंत यांच्या प्रयत्नातून त्यावेळी हा ब्रिज काम बंधारा बांधण्यात आला होता. हा पणदूरवरून वेताळबम्बर्डेला जायला जवळचा मार्ग होता. पण आता हा ब्रिज काम बंधारा वाहून गेल्याने ग्रामस्थांना ७ ते ८ किमी लांबीचा फेरा पडणार आहे. आघाडी सरकार असतना येथे पूल होण्यसाठी सुद्धा प्रयत्न केले होते पण नंतर सरकार बदलले त्यामुळे पूल होऊ शकला नाही असे अमरसेन सावंत यांनी सांगितले. एक मोठा लाकडी ओंडका पुलाच्या खांबाला आदळून पिलर कोसळला असेही श्री. सावंत यांनी सांगितले.
पणदूर आणि वेताळबांबर्डे येथील लोकांना येण्याजाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग होता. पण ढगफुटी सदृश्य पावसाने हा ब्रिजकम बंधारा वाहून गेला. त्यामुळे लोकांची गैरसोय होणार आहे. त्याचप्रमाणे गुराढोरांचा सुद्धा हा येण्याजाण्याचा रस्ता होता. येथे पूल होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे भाजपचे ओरोस मंडल प्रमुख दादा साईल यांनी सांगितले.
दरम्यान कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील हा ब्रिजकम बंधारा होता अशी माहिती दिली.

