निर्माल्य संकलन करून खत निर्मिती
मालवण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग, रेवदंडा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी आदर्शवत असा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गणेश विसर्जन सोहळ्यावेळी निर्माल्य संकलन करण्यात आले. या उपक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोळा करण्यात आलेल्या या निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार आहे.
पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकींच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबवले जात आहेत. यापैकीच वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमांतर्गत प्रतिष्ठान तर्फे गेली १५ वर्षे जिल्ह्यात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यांचे सुमारे पाच ते सहा वर्षे संगोपन करून शासनास हस्तांतरण देखील करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात दीड दिवस ते अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाते. यामुळे ते वाया जाऊन पाणी खराब होते. त्यामुळे असे निर्माल्य प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांद्वारे एकत्रित संकलित करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. अशा प्रकारे पर्यावरण पूरक अभियानातून तयार होणारे कंपोस्ट खत प्रतिष्ठान मार्फत लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.
मालवण तालुक्यात बंदर जेटी, आंबेरी, चिंदर, गावराई, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, कणकवली तालुक्यात तळेरे जाणवली, हळवल, कुडाळ तालुक्यात पिंगुळी, कसाल कोर्लेवाडी वेंगुर्ले येथे परबवाडा तसेच वैभववाडी येथे कोकीसरे अशा १२ वेगवेगळ्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रतिष्ठान तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत होते. अशाप्रकारे सुमारे ३८० श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभागी होत सुमारे सहा टन निर्माल्य संकलित केले. या उपक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

