रेवतळे नदीतील गाळ स्वखर्चाने काढत गणपती विसर्जन मार्ग केला सुलभ
मालवण : रेवतळे येथील नदीत मोठ्या प्रमाणात गाळ वाढला होता. गणपती विसर्जन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी आणि उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने नदीतील गाळ काढत मार्ग मोकळा केला.
रेवतळे येथील नदीत रेवतळे येथील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र, या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे मूर्ती विसर्जन करताना समस्या होत्या. माजी नगरसेवक मंदार केणी, उमेश मांजरेकर यांनी जेसीबीच्या साहाय्याने तेथील मार्ग मोकळा केला. शिवाय विसर्जणासाठी आवश्यक असणारा गाळ काढून खोली केली. त्यामुळे आता गणेश मूर्तीचे पूर्णतः विसर्जन सुलभ होणार आहे. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

