माळगाव ग्रामस्थांमध्ये नाराजी
भाऊ भोगले | बागायत : बागायत ते कुणकावळे असा जोडणारा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे. हा जुन्या बाजार पेठेच्या दळणवळणाचा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो.या रस्त्यात वळणाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असे असतानासुद्धा या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे पाच ते सहा फूट उंचीची झाडी वाढलेली आहे आणि गवताचे साम्राज्य पसरले आहे.मात्र याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष झालेला दिसत आहे. हा रस्ता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अखत्यारित येत असून या रस्त्यात येणारे कुणकावळे आणि चाफेखोल हद्दीतील रस्ता साफ केलेला आहे. मात्र चाफेखोल ते माळगाव अंदाजे दोन कि.मी. रस्त्याचीच झाडी साफ केलेली नाही .असा दुजेभाव का ? असा प्रश्र्न माळगाव व बागायत येथील ग्रामस्थांना पडलेला आहे.अशा या कृतीमुळे सर्व ग्रामस्थ आणि मुंबईतून आलेले चाकरमानी आक्रमक झाले असून सदर झाडी तात्काळ न तोडल्यास सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून घेराव घालण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

याच रस्त्याने चाफेखोल गावचे लोक रेशन , बँक ,डॉक्टर ,शाळा मेडिकल साठी नेहमी माळगाव बागायत येथे बाजारपेठेत ये जा करत असतात. तसेच त्यांना मालवण शहरात जाण्यासाठी या रस्तायचाच वापर करावा लागतो .मात्र रस्त्यातील तीव्र वळणात झाडीमुळे पुढची गाडी दिसत नसल्याने अपघाताचा धोका आहे. आणि साईड पट्टी दिसत नसल्याने दोन गाड्या जात नाहीत तरी संबंधित खात्याने त्वरित विचार करावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


