सजावट आणि पूजा साहित्यासह भाज्या खरेदीसाठी गर्दी
माटवीसामान खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग
निलेश जोशी | कुडाळ : गणेशोत्सव तळ कोकणात पारंपरिकतेनं साजरा केला जातो. सृजनशीलता, नाविन्यता यांना उद्युक्त करणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांसाठी खरेदी करण्यासाठी बाजारात मनमोहक अशा सजावटीच्या साहित्याने दुकानं सजली आहेत आणि गणेशभक्तांच्या गर्दीने बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी कुडाळ बाजारपेठ सज्ज झालीय आहे. कुडाळ बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे. फुलं, फळ, वस्त्र, आभूषण आणि सजावटीच्या वस्तूंची मोठी मागणी आहे. मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू रांगोळी आणि पूजेसाठी लागणाऱ्या अन्य साहित्यांची खरेदी जोरात सुरू आहे. सर्वत्र खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. विक्रेते सुद्धा आपल्या वस्तूंची चांगली विक्री होत असल्याने आनंदी आहेत. अनेक दुकानात गणेशोत्सवाची विशेष ऑफर सुरू आहे. त्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढली आहे. बाजारातली वरदळ पाहून गणेशोत्सवाची चाहूल लक्षात येत आहे.

गणेशोत्सव केवळ धार्मिक सण नाही तर तो सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक एकत्रित करण्याचा सुद्धा उत्सव आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाकरिता घराघरात सजावटीचं काम सुरू झाल आहे. गणपती बाप्पांच्या विशेष सजावटीसाठी कापड या प्रकाराला विशेष मागणी दिसून येत आहे. मखरासाठीच्या साईड पडद्यांसाठी ब्रासो, वेलवेट या प्रकारात कापड दाखल झाली आहेत. याशिवाय टिकली कापड, डेल्टा कापड पूर्वीच्या तुलनेत अगदी आकर्षक रंगात आणि रूपात आले आहेत. यात नेट प्रकारच कापड नवीन रूपात आहे. सजावटीसाठी लागणाऱ्या या कापडाच्या किमती अगदी साठ रुपये मीटर पासून पुढे आहेत.

बाप्पाच्या गळ्यात घालण्याचे मोहक आणि आकर्षक कंठीहार आपली पारंपरिकता आज सुद्धा टिकवून आहेत. कंठीहाराची मागणी कमी झालेली नाही. विविध रूपातले मणी, तसेच आकर्षक फुल, यांच्या साह्याने विशेष हार बनवण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लॉवर पट्ट्या विविध रूपात दाखल झाल्या आहेत. फ्रंट बॅक यानुसार फ्रेम तयार करण्यात आल्या आहे. या फ्रेम वर फोन लावून त्यावर रंगीबेरंगी फुलं चिकटवण्यात येऊ शकतात. यावर्षी सजावटीसाठी खास फुल बाजारात दाखल झाली आहेत. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही फुलं उपलब्ध आहेत. बॅकग्राऊंड साठी आर्टिफिशियल फुलांनी सजवलेले विविध आकारातले स्टॅन्ड लक्ष वेधून घेतायेत. चंद्राचा आकार वर्तुळाकृती आकार यासह विविध फ्रेम्स मध्ये हे स्टॅन्ड तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार फोल्डिंग प्रकारात हे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्यात आलेत. त्यांच्या किमती मात्र हजार रुपयांच्या पटीत आहेत.

गणपती उत्सव म्हटला की त्यासाठी आकर्षक प्रकाश योजना आली. त्यासाठी सुद्धा दुकान सजलेली आहेत. अनेक विविध रूपात प्रकाशाचे विविध रंग बापांच्या सजावटीसाठी निर्माण करण्यात आलेत. विविध प्रकारच्या स्पॉटलाईट वेगवेगळ्या डिझाइनमध्ये तयार करण्यात आले आहेत. यामध्ये स्टार छोटे-मोठे गोलांचे प्रकार, फुलांचे प्रकार, तसेच पॉईंट मध्ये हे लाईट प्रकाशित करण्यात येत आहेत. सजावटीसाठी विजांच्या माळांनी आपली पारंपरिकता टिकून ठेवली आहे. चाळीस फुटांमध्ये नियमित तोरण तसेच नवीन प्रकारात मल्टी कलर मध्ये एलईडी दिव्यांचे तोरण बनवण्यात आल आहे.
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी पूजा साहित्याची दुकान सुद्धा सजली आहेत. अनेक प्रकारच्या उदबत्या, धूप, कापूर,धूप पावडर, गंध, वस्त्र, अष्टगंध,असं वेगवगळ्या व्हरायटी मधलं साहित्य या दुकानातून पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या खरेदीसाठी सुद्धा ग्राहक गर्दी करत आहेत. फुल आणि हारतुरे दुकान सुद्धा सजली आहेत. एखादा सण उत्सव म्हटला की फटाक्यांची आतिषबाजी आलीच. त्यासाठी फटाक्यांची दुकान सुद्धा सज्ज झाली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि आवाजाचे फटाके या दुकानातून पाहायला मिळत आहेत.

वेगवेगळ्या मूर्ती शाळातून गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. गणपती बाप्पांच्या सोज्वळ सुबक आकारावर सात्विकतेचं रंग सजू लागले आहेत. कुंचल्यांची लगबग वाढली आहे. गणपती शाळेत अल्हाददायक सुखद अनुभूती घेण्यासाठी गर्दी सुद्धा वाढायला लागली आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता वाढत असताना ठीक ठिकाणी महाउत्सवाचे वेध तीव्र होऊ लागले आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे आणि बरेच जण आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती घेऊन येत असल्यामुळे कुडाळ बाजारपेठेमध्ये ठीक ठिकाणी माटवीच साहित्य घेऊन बसणारे विक्रेते सुद्धा पाहायला मिळाले. हे मटविच साहित्य विकत घेण्यासाठी सुद्धा गणेश भक्तांनी गर्दी केली होती. . गणपती बाप्पा समोर सकाळ संध्याकाळ दणक्यात आरती करण्यात येते आणि ह्या आरतीला सात असते ती टाळ, ढोलकी आणि तबल्याची. हि छोटी छोटी ढोलकी विकणारे विक्रेते सुद्धा कुडाळ बाजारपेठेमध्ये दिसून आहेत दिसून येत आहेत.

विविध प्रकारच्या भाज्या फळ यामुळे यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. कुडाल शहरांमध्ये पोलीस स्टेशन नजीकच्या त्रिकोणी जागेत नगरपंचायतीने भाजीविक्रेतांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे गणेश भक्तांना एकाच ठिकाणी भाज्या खरेदी करणे सोयीचे ठरत आहे. बाजारपेठांमध्ये चाकरमान्यांची आणि गणेश भक्तांची गर्दी वाढली असून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस बांधव सुद्धा सज्ज झाले आहेत.

सिंधुदुर्गातल्या गणेशोत्सवाची ही खासियत आहे की येथे उत्सव साजरा करताना, आपल्या परंपरेला जपताना लोक आधुनिकताही स्वीकारतात. त्यामुळे हा उत्सव इथल्या लोकांच्या जीवनात खास स्थान मिळवतो. जो त्यांना एकत्र आणतो आणि आनंद देतो. गणेश चतुर्थीचा हा उत्सव आपल्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणार आहे जो सिंधुदुर्गातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात विशेष स्थान राखतो.

