राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना : संशयीत आरोपीस न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला शुक्रवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा व संशहयीत आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी चेतन पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे यांनी दिली.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्या विरोधात सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत येथील पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी यातील बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथून ताब्यात घेत शुक्रवारी येथे आणले. त्याची चौकशी करत अटक करण्यात आले. शनिवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने केलेल्या युक्तीवादात पुतळ्याचे काम कसे केले याचा पुरावा गोळा करायचा आहे. यात अन्य काही व्यक्ती होत्या का? याची तपासणी करायची आहे. शिवाय याठिकाणी लाखो पर्यटक येत असल्याने हा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी पर्यटकांच्या जीवितासही धोका निर्माण असता. पुतळा उभारताना पर्यावरणाचा अभ्यास केला होता का? यासह अन्य बाबींचा तपास करायचा आहे. शिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे हा पसार असल्याने संशयित आरोपी पाटील याला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. संशयित आरोपीच्या वकिलांनीही आपला युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी चेतन पाटील याला ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे यांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे करत आहेत.

