मनसे उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे आवाहन
पुतळ्याचे अवशेष सुरक्षित ठिकाणी ठेवा
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पालकमंत्र्यांनी महाराजांच्या पुतळ्याची होणारी विटंबना थांबण्याचे प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडून चार दिवस झाले. पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ पाहणी दौराही केला. दोषींवर गुन्हा दाखल करणे किंवा कडक कारवाई करणे संदर्भात प्रशासनाला आदेश दिले. दोषींवर कारवाई सुद्धा होईल. त्यानंतर राजकीय फायद्यासाठी असेल किंवा नैतिकतेसाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांचे पाहणी दौरे आयोजित करून आपसात राडेही करून झाले. परंतु महाराजांचा पुतळा पडून चार दिवस झाले तरी पुतळ्याचे विखुरलेले अवशेष तसेच पडून असल्यामुळे त्या अवशेषांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य सूचना करावी. तसेच शासकीय नियमानुसार पंचनामा करून महाराजांच्या पुतळ्याचे विखुरलेले अवशेष सुरक्षित ठिकाणी कडक बंदोबस्ता मध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी.

