आचरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घोषणाबाजी
आचरा : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आचरा तिठा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा विभागाच्या वतीने सत्ताधारी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा निषेध असो, अशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, संघटक मंगेश टेमकर, माजी सरपंच श्याम घाडी, विभाग संघटक पप्पू परुळेकर, दिलीप कावले, जुबेर काझी, शहरप्रमुख माणिक राणे, युवासेना शहरप्रमुख मुन्ना परब, त्रिंबक शाखाप्रमुख संतोष गोखले, माजी शहरप्रमुख राजू नार्वेकर, चंदन पांगे, दशरथ वायंगणकर, दिपेश लब्दे, चिंदर शाखाप्रमुख मिथुन माळगावकर, रुपम टेमकर, सुनील माळकर, राजू परब, भाऊ परब, सदानंद घाडी, तळीराम पेडणेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आमचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले तीन शतकांनंतरही अभेद्य आहेत. किल्ले सिंधुदुर्ग 350 पेक्षा जास्त वर्षे अजस्त्र लाटा सहन करत आहे. मात्र आठ महिन्यापूर्वी महायुती सरकारने राजकोट किल्ला येथे उभारलेल्या छत्रपतींचा पुतळा कोसळणे हे दुर्दैव आहे. हा समस्त भारतवासियांचा अपमान आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध करत आहोत, असे युवासेना शहरप्रमुख विद्यानंद परब म्हणाले. छत्रपतींचा पुतळा दुर्घटना दुदैवी आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधित दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी समीर लब्दे यांनी केली.

