विजेच्या लपंडावामुळे गणेश मूर्ती शाळा अडचणीत
कुडाळ : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कुडाळ तालुक्यातील नेरूर विभागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गणपती शाळेतील कारागिरांची कामे सुध्दा खोळंबली आहेत. महावितरणचे लक्ष वेधून सुध्दा महावितरण कडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे संतप्त नेरूर ग्रामस्थांनी गणेश मूर्ती घेऊन महावितरणच्या अधिक्षक कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. या ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता अजितपालसिंह दिनोरे यांना त्यांच्या चेंबरमध्येच घेराव घातला.
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा विभागात विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. त्यामुले वीज ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबत येथील ग्रामस्थांनी वारंवार महावितरणचे लक्ष वेधले. मात्र महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, विजेच्या खेळखंडोबामुळे गणेश मूर्ती शाळांमधील कामे रखडली आहेत. परिणामी नेरुर विभागातील ग्रामस्थ आज आक्रमक झाले. या ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे गणेश मूर्ती घेऊनच ग्रामस्थ कार्यालयात आले व त्यांनी कार्यालयाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यालयात असलेल्या महावितरण कार्यकारी अभियंता श्री. दिनोरे यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थांचे हे आंदोलन सुरू होते.
यावेळी सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,माजी सरपंच शेखर गावडे,समद मुजावर,दिपेश कदम, मंगेश बांदेकर,श्याम करलकर, प्रभाकर गावडे, अजित मार्गी, अमित बाणे,रोहीदास चव्हाण,प्रविण नेरूरकर आदीसह नेरूर ग्रामस्थ उपस्थित होते. त्याच बरोबर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे,ए.डी.महाडीक हे देखील उपस्थित होते.

