धनगर बांधवांचे कुडाळ पोलिसांना निवेदन
तात्काळ अटक करण्याची मागणी
कुडाळ : तालुक्यातील धनगर समाजातील एका महिलेला बेळगाव येथे नेऊन घावनळे येथील संशयित आरोपी चंद्रकांत मराठे याने अत्याचार केला. त्याच्या विरोधात वेंगर्ले पोलिस स्थानकात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास कुडाळ पोलिस करत आहेत. मात्र कुडाळ पोलिस संशयित आरोपीला का अटक करत नाहीत? संशयिताच्या प्रविण नामक साथीरादाकडून का माहिती घेत नाहीत? कुडाळ पोलिस संशयिताला ‘दया’ का दाखवत आहेत? असा संतप्त सवाल घावनळे येथील धनगर समाजातील बांधवांनी उपस्थित करत संशयित आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी केली. यावेळी घावनळे माजी उपसरपंच दिनेश वारंग, अॅड. किशोर वरक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी निवेदन देवून पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
घावनळे ग्रामस्थांनी दिेलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षापासून धनगर या भटक्या जमातीतील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. मात्र या समाजातील बहुतांशी लोक अशिक्षित व अडाणी असल्यामुळे व त्यांना कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून पोलीस स्थानकात अत्याचार करणार्या लोकांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तसेच पोलीस प्रशासनाकडूनही या समाजातील लोकांना न्याय मिळत नसल्याने त्यांना अत्याचारास सामोरे जावे लागत आहे. अशाचप्रकारे कुडाळ तालुक्यातील एका पीडित महिलेने संशयित आरोपी चंद्रकांत मराठे याच्या विरोधात वेंगुर्ले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार वेंगुर्ले पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला असून त्या गुन्ह्याच्या तपासाकरीता सदर केस कुडाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेली आहे. कुडाळ पोलिस त्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये पिडीत महिलेवर संशयित आरोपी चंद्रकांत मराठे याने बेळगाव येथे नेऊन अत्याचार केला व त्या घटनेचे व्हिडिओ शूटिंग केल्याचे नमूद केले आहे. मात्र चार दिवस उलटूनही कुडाळ पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक केलेली नाही. आरोपीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला असून त्याचा अर्ज प्रलंबित आहे. असे असताना कुडाळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे थांबविले आहे. आरोपी हा धनिक असून त्याचे राजकीय संबंध आहेत, त्यामुळे कुडाळ पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे संशयिताला पोलीस अटक करत नाहीत. सदर प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याकडून अज्ञात घटनास्थळाची माहिती घेणे, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे, व्हिडिओ शूटिंगसाठी वापरलेला मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे. सदर आरोपीस अटक न होता जामीन मिळाल्यास सदर गुन्हा केव्हाही उघडकीस येणार नाही. संशयित आरोपी याने यापूर्वी गावातील व शेजारील गावातील महिलांची छेड काढणे, वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणे अशा घटना घडलेल्या आहेत. सदर व्यक्ती विरोधात गावातील महिलांमध्ये असंतोष आहे. तरी सदर आरोपीस लवकर अटक करण्यात यावे अशी विनंती केली आहे. या निवेदना दरम्यान कुडाळ निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी या प्रकरणी तपास सुरू असून संशयिताला जामीन मिळणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. यावेळी घावनळे माजी उपसरपंच दिनेश वारंग, अॅड. किशोर वरक, सरपंच आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, व्हि.जे. एनटी भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक खरार, सुरेश झोरे, आबा कोकरे, रामचंद्र कोकरे, संतोष कोकरे, मयुरी कोकरे, सावित्री कोकरे, तारामती कोकरे आदिसह धनगर बांधव उपस्थित होते.
तो ‘दया’ वान पोलिस कोण?
कुडाळ तालुक्यातील एका महिलेवर बेळगाव येथे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रकांत मराठे याला कुडाळ पोलिस अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे त्या संशयित आरोपीला कुडाळ पोलिसांचा एक पोलिसच ‘दया’ दाखवित आहे. असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या समोर केला. या आरोपाचे श्री. मगदूम यांनी खंडण करत पोलिसांचा तपास योग्य प्रकारे सुरू असल्याचे छातीठोक पणे सांगितले. पण खरंच ग्रामस्थांच्या आरोपात तथ्य असेल तर कुडाळ पोलिस प्रशासनामधील संशयित आरोपी चंद्रकांत मराठे याला ‘दया’ दाखविणारा पोलिस कोण? याबाबत उलट सूलट चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे कोलकाता घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचवेळी त्याच प्रवृत्तीला जर कोणी संरक्षण देत असेल तर ते समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने फार चिंताजनक आहे.

