कोळंब येथील समाधान शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात जे अधिकारी माहिती देत आहेत ती खूप तळमळीने देत आहेत.आपल्या नागरिकांना शासनाच्या योजनाचा लाभ जलद मिळावा हाच उद्देश या शिबिराचा आहे. आपल्या कामात विनाकारण किंवा मुद्दामून कधीही कुठला कर्मचारी दिरंगाई करत नाही त्यात काही त्रुटी असतात.त्यामुळे जर कामात दिरंगाई होत असेल तर या पुढे कामाचे नियोजन वेळेचे नियोजन करून लवकरात लवकर कामे कर्मचारी पूर्ण करतील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी शीतल जाधव यांनी दिली.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या शासन निर्णया नुसार तहसीलदार मालवण कार्यालय मालवण मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान महसूली मंडळ स्तरावर कोळंब येथील समर्थ मंगल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मालवण तहसीलदार गणेश लव्हे, माजी पंचायत समिती सभापती सुधीर साळसकर, माजी जि.प.बांधकाम सभापती अनिल न्हीवेकर, प.स.सदस्य योजना कांबळी, मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, कांदळगाव उप सरपंच राजेंद्र कदम, कोळंब सरपंच सिया धुरी, उप सरपंच विजय नेमळेकर,बिळवस सरपंच संतोष पालव, आधी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वल आणि स्थानिक महिला ग्रामस्थाच्या स्वागत गीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी मिनल चव्हाण म्हणाल्या.आपले दैनंदिन प्रश्न असतात ते प्रश्न फार मोठे नसतात पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की कुठे मिळतील ते आपल्या माहिती नसत त्यामुळे आपण फिरत राहतो त्यामुळे आपलं काम ही अर्धवट होत म्हणून या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सर्व महसूल अधिकारी, तहसीलदार ते महसूल सेवक कर्मचारी एका छता खाली आलो आहोत.शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकरी नागरिकां पर्यंत पोहचाव्यात यासाठी हे समाधान शिबीर अभियान राबविण्यात आले आहे. या शिबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी मिनल चव्हाण यांनी केले.

यावेळी समाधान शिबिरात कृषी विषयी योजनांची माहिती, आरोग्य विषयक योजना ची माहिती, भूमी अभिलेख कार्यालय यांच्या योजना ची माहिती, निबंधक कार्यालय यांच्या योजना ची माहिती, त्याच प्रमाणे शासन स्तरावरील विविध योजना ची माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना मालवण तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनांची पूर्ण माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. म्हणून च या समाधान शिबीर अभियान चे आयोजन केलं आहे. लोकांना योजनांचा लाभ एका छता खाली मिळवून देणे हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे. हे शिबीर एका दिवसा करता मर्यादित असणार नाही तर प्रशासना कडून किंवा महसूल विभागा कडून लोकांना ज्या दैनंदिन गरजेच्या सुविधा दिल्या जातात त्या तत्परतेने दिल्या जाव्यात असे पथक येथून पुढे आम्हाला निर्माण करायचे आहे.त्या दृष्टीने आम्ही निश्चितच सुरुवात केली आहे.असे श्री तहसीलदार श्री गणेश लव्हे म्हणाले.

यावेळी मालवण तालुक्यातील कोळंब, नीवे,कांदळगाव,रेवडी, हडी, सर्जेकोट मिर्याबांद, महान, बिळवस, आंगणेवाडी, माळगाव, पानखोल जुवा, आदि महसुली गावतील लाभयार्थ्याना शासनाकडून देण्यात येणारे विवीध योजनांचे दाखले, प्रमाणपत्र,सातबारा, फेरफार, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कणेरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार, महसूल विभाग, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आणि मंडळ अधिकारी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



