दर्शनासाठी भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत
मालवण | प्रतिनिधी :
कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार देवस्थानचा "रौप्य महोत्सवी वर्ष" सोहळा भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या रौप्य महोत्सवी सोहळ्या निमित्त कातवड गाव भक्ति रसात न्हाऊन गेला होता.
भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसला पावणाऱ्या कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार येथे सुमारे 25 ते 30 वर्षां पूर्वी याठिकाणी जुना जीर्ण असा औदुंबर वृक्ष होता. तसेच चार मोठ्या शिवनीची झाडे होती.पूर्वीचे स्थानिक ग्रामस्थांचे बैलगाडी हेच वाहतुकीचे साधन असल्याने याठिकाणी सावली यामध्ये बैलगाड्या उभ्या केल्या जात असत. आजूबाजूला शेतजमीन असल्याने ग्रामस्थ शेती व्यवसाय करतात.पूर्वीच्या स्थानिक ग्रामस्थ शेतकरी यांना याठिकाणी देवस्थान असल्याची जागृती झाली असावी. त्यानुसार 1984 पासून याठिकाणी पार बांधण्यात यावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र त्याकाळी रोजगरची काही मोठी साधने नसल्याने आर्थिक पाठबळ कमी मिळत असे. तरीही ग्रामस्थ छोटेखानी कार्यक्रम करत असत. 2001 ते 2002 मध्ये ग्रामस्थानी पुढाकार घेऊन श्रमदानातून याठिकाणी हा पार बाधला. जानेवारी 2002 पासून पार बाधण्याचे काम हाती घेतले होते.ते 2 मे 2002 रोजी पूर्ण झाले.आणि पहिली श्री सत्यनारायणाची महापूजा याठिकाणी बाधण्यात आली. त्यापासून दरवर्षी हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. स्थानीक ग्रामस्थ महिला वर्ग आणि दानशूर व्यक्ती यांची मोलाची साथ या कार्यक्रमास लाभत आहे.


या वर्षी देवस्थानच्या 25 व्या रौप्य महोत्सवी सोहळ्या निमित्त सकाळी लघुरूद्र, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देव सत्यनारायांची महापूजा, ग्रामस्थांची महा आरती, संपन्न झाली.सायंकाळी महापुरुष देवाच्या दर्शनासाठी भविक भक्तांची अलोट गर्दी झाली होती. कांदळगाव येथील बुवा श्री राजन कोदे व स्थानिक ग्रामस्थाचे संगीत सुस्वर भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. ग्रा. प.सदस्य मंगेश चव्हाण यांनी श्रीफळ वाढवून रंगमंचाचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.


यानंतर वेंगुर्ला म्हापण येथील अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या नाट्य कलेने उपस्थित रसिकांची मने जिंकली. रविवारी दुपारी ब्राह्मण भोजन करून या रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री महापुरुष मित्र मंडळ कुदळभामच्या कार्यकर्त्यानी व महिला वर्गाने मोठी मेहनत घेतली .

