कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय शतक महोत्सवी सोहळा
मालवण | प्रतिनिधी : कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ दिमाखात झाला. शताब्दी महोत्सवाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), ऍड. एस. एस. पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, जि प उपाध्यक्ष दादा साहिल, जि प वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवीलकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, व्हिक्टर डॉन्ट्स, जि प सदस्या सुमेधा पाताडे, जि प सदस्या दिपलक्ष्मी पडते, पस सदस्य संतोष गावडे, संस्थेचे सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, स्कुल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच आबा कामतेकर प्रभाकर वाईरकर, गणपत जाधव, रवींद्रनाथ पावसकर, साबाजी गावडे, महेश वाईरकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, आनंद टेमकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, अविनाश जठार व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सुनील नाईक यांनी प्रास्ताविक केले.
स्व. डॉ. काकासाहेब वराडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून लावलेले वराडकर हायस्कुल रुपी रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व या शिक्षणसंस्थे सोबत जोडले आहेत, कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, शिक्षकांना गुरुस्थानी मानले पाहिजे. मुलांनी तन, मन, धन अर्पून उत्तम शिक्षण घेत प्रगती साधावी. शाळेच्या विविध शैक्षणिक गरजा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.
दत्ता सामंत पुढे म्हणाले, मुलांनी आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. विद्यार्थ्यांनी या संस्थेवर, शिक्षकांवर प्रेम केले पाहिजे. शिक्षकांचा आदर करत त्यांचे ऐकले पाहिजे. आज स्पर्धा वाढली असून या स्पर्धेत आपली मुले टिकण्यासाठी शिक्षकांनी मुलांची आवड लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे. आज नोकऱ्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडले पाहिजेत. असेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी विचार मांडले.
अमित खोत, मालवण

