कोकण आणि दादा अतूट नाते…
माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन…
महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यावर कोकण म्हणजे नारायण राणे ही ओळख आजही जपली जाते. एखाद्या प्रदेशाला एखाद्या नेत्याच्या नावाने ओळखणे हा त्या नेत्यांचा आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाचा बहुमान आहे. आपल्या कार्यशैलीने जनमाणसाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे काही मोजकेच नेते राजकीय पटलावर ओळखले जातात. त्यापैकीच एक अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे साहेब हे होय. आज १० एप्रिल खासदार नारायणराव राणे साहेब यांचा वाढदिवस. हा वाढदिवस म्हणजे कोकणच्या अभिमानाचा आणि उत्सवाचा क्षण आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वरवडे या गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने उतुंग भरारी घेते. कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा नावलौकिक वाढवते. तमाम कोकणवासियांसाठी हा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेली चार दशके आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आदराचे नेतृत्व अर्थात जेष्ठ खासदार नारायण राणे साहेब हे होय. राजकीय पटलावर 'नारायण राणे' यां नावाचा दबदबा कायम आहे.


कोकणच्या विकासात राणे साहेबांचे फार मोठे योगदान आहे. त्या बरोबरच राज्याच्या राजकीय पटलावर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून निर्माण केलेला ओळख त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणारी आहे. मंत्री, मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात राणे साहेबांनी सर्वोत्तम असे आदर्शवत काम केलेच मात्र विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने गाजली. त्या काळातील त्यांची भाषणे, सत्ताधाऱ्यांवर असलेला अंकुश, शाब्दिक प्रहार सारेकाही दिशादर्शक आणि आदर्शवत असेच राहिले. राज्यातील लोकहिताच्या दृष्टीने त्यांचा कारभार सर्वोच्च असाच राहिला. देशाचे सर्वोच्च सभागृह संसद भवन दिल्लीच्या तख्तावरही त्यांचे नाव आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. दिल्लीत त्यांना असलेला आदर हा कोकणचा महाराष्ट्राचा सन्मान आहे. आपला सन्मान आहे.



विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण राहिली. एखाद्या विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करणे. त्यांनंतर त्या विषयावर भाष्य करणे. आकडेवारी लक्षात ठेवणे. त्याचा अभ्यास करणे. सभागृहात नेतृत्व कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे नारायण राणे हे होय.


कोकणचे 'दादा' नेतृत्व राजकारणात सर्वाधिक आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आदराने ओळखले जाते. राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात ही राणे साहेबांचा दरारा आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे साहेबांकडे कॅबिनेट मंत्री पदाची जबादारी दिली. मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा विशेष असा उमटवला.


खासदार नारायण राणे अर्थात दादा यांना जनतेचा पाठिंबा नेहमीच मिळाला. दादांनीही कोकणी जनतेवर जीवापाड प्रेम केले. कोकण आणि दादा एक अतूट नाते नेहमीच राहिले. आजही आहे. कार्यकर्ते जपणारे नेतृत्व. जनतेला आपल्या कुटुंबातील सदस्य मानणारे नेतृत्व ही राणे यांची विशेष ओळख राहिली.




नारायण राणे साहेब यांची कारकीर्द एवढी मोठी आहे. की एखाद्या लेखात मावणार नाही. कोकणचे हे नेतृत्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा प्रवास करून खासदार म्हणून आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात कोकणचे प्रतिनिधित्व करत आहे. सक्षमपणे कारभार करत पाहत आहेत, दादा दिल्लीत असले तरी कोकण आणि महाराष्ट्र यांच्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे आणि कायम राहील. अश्या या लोकनेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दादा आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री देव रामेश्वर चरणी प्रार्थना… वाढदिवस अभिष्टचिंतन…!
✒️ अमित खोत, मालवण

