निसर्ग शाळेतील मुलांनी दिला स्वच्छतेचा संदेश
राहुल जाधव | मालवण :- निसर्ग शाळा ही मालवण मधील 'यूथ बिट्स फॉर क्लायमेट' संस्थे सोबत संलग्न असून 'ईकोमेट्स' अंतर्गत दर रविवारी भरवली जाते. ज्यामध्ये लहान मुलांना निसर्गाविषयी माहिती व्हावी ते निसर्गाशी जास्त जोडले जावेत हा त्यामागचा निस्वार्थ हेतु आहे. दरवर्षी काही ठराविक मुलांना घेऊन ही शाळा जून च्या पावसाळी ऋतु मध्ये चालू होते. व मार्च च्या शेवटी त्याची सांगता होते. यावेळी या शाळेने या वर्षाचा शेवट वेगळ्या प्रकारे करायच ठरवले.

निसर्ग शाळेची सहल किल्ले निवती येथील कांदळवन क्षेत्र आणि 'डुंगोबाची राई' देवराईला भेट द्यायला पोहोचली. डुंगेश्ववर हे स्थानिकांचे श्रद्धास्थान. इथली कुठलीही गोष्ट त्या परिसराच्या बाहेर न्यायची नाही हा दंडक. त्यामुळे तिथे झालेला कचरा तसाच पडून राहिला. काही दिवसांपूर्वी युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सोबत अभिनेते आणि सह्याद्री मित्र सयाजी शिंदे यांनी या जागेला भेट दिली होती. तेथे असलेला प्लास्टिकचा कचरा पाहून ते व्यथित झाले होते. हा कचरा इथून उचलला पाहिजे ही सूचना त्यानी केली होती. त्यामुळे निसर्ग शाळेच्या निमित्ताने हा कचरा स्वच्छ करायचे ठरले.

निसर्ग शाळेची मूल, यूथ बिट्स फॉर क्लायमेट आणि ईकोमेट्स चे सदस्य व काही स्थानिक असे मिळून तब्बल २८ जणांनी मिळून डुंगोबाच्या राई ला प्लॅस्टिक पासून मुक्त करायला हातभार लावले व तब्बल ६ बॅग प्लास्टिक बाटल्या आणि उदबत्तीच्या पुड्या यांनी भरून गेल्या. आणि अश्या प्रकारे डुंगेश्वरचा प्लास्टिकच्या कचऱ्यात घुसमटलेला श्वास मोकळा झाला.

यावेळी तिथे स्थानिक म्हणून मंदार गावडे आणि निवतकर हे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी मुलांना डुंगोबाच्या राई बद्दल माहिती दिली. या देवराई मध्ये सुंदरी चे झाड आहे. पश्चिम बंगाल या ठिकाणी सुंदरीची अनेक झाडे दिसतात परंतु आपल्याकडे फक्त निवती आणि खवणे या भागातच सुंदरीची अशी झाडे आहेत. काही वर्षांपूर्वी वन खात्याने सुमारे ७० हजार सुंदरीची रोपे तयार करून ती जिल्ह्यात अनेक ठिकाणी लावली. परंतु ती झाडे तीन-चार वर्षानंतर तग धरू शकली नाहीत. या झाडासाठी लागणारी माती, वातावरण आणि जागा हे या डोंगर परिसरातच आहे त्यामुळे ही झाडे जगवणे आणि वाचवणे खूप महत्त्वाचे आहे असे दुर्गा ठिगले मॅडम म्हणाल्या. त्यामुळे अश्या देवराईंना सुरक्षित ठेवणे अजूनच आवश्यक ठरते.


