मालवण |प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंदर सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाने महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. केवळ उत्सव न करता सामाजिक भान जपण्यासाठी या वेळी उपस्थित सर्व 38 महिलांना फळझाडांची रोपे आणि भेटवस्तू (डिश) यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांसाठी विविध मनोरंजक आणि कौशल्य आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सडेवाडीतील गोसावीवाडी, हडकरवाडी, देवकोडवाडी या वाडीतील 38 महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धांमधून महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले.स्पर्धात्मक उपक्रमामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्या 1) समीक्षा कांबळी, 2) स्वाती सुर्वे, 3) अंजली गोसावी या महिलांना मंडळाच्या वतीने विशेष आकर्षक डब्याची भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित प्रत्येक महिलेला देण्यात आलेली फळझाडांची रोपे . "घराघरात वृक्षारोपण व्हावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे," या उद्देशाने हा स्तुत्य निर्णय घेतल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले . तसेच प्रत्येक महिलेला आठवण म्हणून उपयुक्त डिशचेही वाटप करण्यात आले. "महिला हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना निसर्गाशी जोडणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू होता." याच वेळी नवनियुक्त पंचायत समिती सदस्य मा. श्री. दीपक सुर्वे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यकर्ते, नाथ गोसावी युवक मंडळ या कार्यक्रमामुळे परिसरातून नाथ गोसावी युवक मंडळाच्या सामाजिक कार्याचे आणि कल्पकतेचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

