मालवण : ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वायंगणी मार्फत महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मात्र काही दिवसांपूर्वी वायंगणी गावातील सौ. अंतरा हर्षद दुखंडे या शिक्षकी पेशातील महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तसेच पोलीस तपासात महिलेचा मृत्यु कशामुळे झाला हे काहीच स्पष्ट होत नसल्यामुळे गावातील महिलावर्गामध्ये तीव्र संताप आहे. या संदर्भात गावातील महिलांनी मालवण पोलीस ठाणे येथे निवेदन दिले. सखोल तपासाची मागणी केली होती. एकूणच यां सर्व घटनेच्या निषेधार्थ व न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी गावातील महिलावर्गाने ८ मार्च रोजी आयोजित महिला ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे.

