आकारीपड जमिनीबाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही !
आदित्य बटावले | कुडाळ : माणगाव खोऱ्यात असलेल्या २००० हेक्टर आकारीपड प्रश्नाबाबत वरच्या स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे आमदार नीलेश राणे यांनी सांगितले. कुडाळ पंचायत समिती येथे पं स. अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांच्या कामांचा आढावा आमदार राणे यांनी गुरुवारी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे उपस्थित होते.
माणगाव खोऱ्यात असलेल्या २००० हेक्टर आकारीपड प्रश्नाबाबत वरच्या स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. जलजीवन योजनेतील कामे निकृष्ट झाली आहेत. आतापर्यंत या अधिकाऱ्यांना जाब विचारणारा कोणीच नव्हता, पण आता या अधिकाऱ्यांना आपण जाब विचारून चांगली कामे करून घेणार आहे, असे राणे यांनी सांगितले. लवकरच जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत जलजीवनची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.
कुडाळ तालुक्यामधील आपल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर पाठविलेल्या अहवालाची माहिती नाही, ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांची ही पद्धत मला बदलायची आहे. आपण एकत्र काम केले, तर निकाल मिळणार. आता मंत्रालयातून निधी आणायचा आहे. कशा पद्धतीने काम करायचे, याची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली आहे. भविष्यात टाईमबाँड असणार असून कामात दिरंगाई चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लवकरच महावितरण, सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल, एमआयडीसी या सर्व विभागांची स्वतंत्र बैठक येत्या आठवडाभरात घेतली जाईल. त्या-त्या विभागाचे सर्व प्रश्न वेळेत कसे मार्गी लागतील, या दृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यानी सांगितले.
कुडाळ रेल्वेस्थानकावर महत्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, यासाठी खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात येतील. रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे आमदार राणे यांनी सांगत कोकण रेल्वे भारतीय रेल्वेशी जोडून द्या, अशी आमची मागणी आहे. शासनाकडे आपण तशी मागणी करणार, असे सांगितले. कुडाळ हे मध्यवर्ती स्थानक असून अनेक महत्वाच्या रेल्वेंना कुंडाळ स्थानकावर थांबा नाही, याकडे राणेंचे लक्ष वेधले असता, ते बोलत होते. कोकण रेल्वे महामंडळाला थांबे व अन्य सुविधा स्थानकावर देणे शक्य होत नसेल, तर कोकण रेल्वे भारतीय रेल्वेशी जोडून द्या. मग सर्व समस्या मार्गी लागतील, असे ते म्हणाले.

