आचरा केंद्रशाळेचा शारदोत्सव उत्साहात :
भारतीय संस्कृतीचे दर्शन
आचरा : एका बाजूला पावसाअभावी संकटात सापडलेला शेतकरी, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या आभासी जगात गुरफटत चाललेला समाज... या ज्वलंत प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून आणि नृत्यातून प्रभावी भाष्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिसरीच्या वर्गाने शेतकऱ्याची व्यथा मांडणारी नाटिका आणि दुसरीच्या वर्गाने सोशल मीडियाच्या वाढत्या विळख्याचे विदारक वास्तव उलगडणाऱ्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतानाच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा आचरा केंद्रशाळेचा शारदोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
शारदोत्सवानिमित्त सकाळी श्री सरस्वती देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाटीपूजन केले. बाजारपेठ येथील बाळगोपाळ मंडळाच्या वतीने महाआरती सादर करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, सर्व समिती सदस्य, मुख्याध्यापक सिद्धेश हळवे, शिक्षिका अनिता पाटील, दीपाली खंडगावकर, शारदा बिसेन, पूनम मेळकुंदे, तेजल बागडे तसेच केंद्रप्रमुख चंद्रशेखर गाड यांचे सहकार्य लाभले.
यंदा पावसाने दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशालेतील शिक्षकांच्या संकल्पनेतून आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून भारतीय संस्कृती व दुष्काळ या विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, दक्षिण भारत, पंजाब आदी राज्यांतील लोकप्रिय गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून विविध संस्कृतींचे दर्शन घडविले. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील चिमुकल्यांनीही ट्रेंडिंग गाण्यांवरील नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
सहावीच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी समाज सोशल मीडियाच्या महाजालात कसा अडकत चालला आहे, याचे वास्तव प्रभावीपणे सादर केले. ‘काले मेघा, पानी तो बरसाओ’ आणि ‘बरसो रे मेघा रे’ यांसारख्या गीतांवरील नृत्यांतून विद्यार्थ्यांनी पावसासाठी निसर्गराजाला जणू साद घातली. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाविषयी संवेदनशीलता जागविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांतून करण्यात आला. रात्री उशिरा बुवा संदेश मेस्त्री यांच्या सुश्राव्य भजनाने शारदोत्सवाची सांगता झाली.

शेतकऱ्याची व्यथा अन् सोशल मीडियाचे वास्तव
