मालवण | प्रतिनिधी:- मालवणच्या समुद्रात किनाऱ्यालगत एलईडी लाईट माध्यमातून होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपारिक रापण मच्छिमारांना मासळी मिळेनाशी झाली असून यामुळे रापण मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे त्रस्त बनलेल्या श्रमजीवी रापण संघाच्या मच्छिमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत किनाऱ्याजवळ चालणाऱ्या अनधिकृत प्रखर प्रकाशझोत व पाग मासेमारीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मत्स्य अधिकाऱ्यांकडे केली. तसेच अनधिकृत मासेमारीमुळे व हवामानातील बदलामुळे मासेमारी व्यवसायात निर्माण झालेली गंभीर स्थिती लक्षात घेऊन मत्स्यदुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
श्रमजीवी रापण संघाचे जिल्हा सचिव दिलीप घारे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बहुसंख्य रापण मच्छिमार उपस्थित होते. यावेळी मच्छिमारांच्यावतीने मत्स्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
नवीन मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर गणेश चतुर्थी ते देवदिवाळी या काळात किनाऱ्याजवळ येणाऱ्या खांडवी मासळीवर रापण व्यवसाय अवलंबून असतो. यंदाच्या हंगामात चतुर्थीनंतर रापण संघांना म्हाकूल मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, काही गिलनेटधारकांनी आपल्या नौकांवर जनरेटरद्वारे प्रखर प्रकाशझोत लावून पाग मासेमारी केली. किनाऱ्याजवळील म्हाकूल मिळतं नाही अशी स्थिती निर्माण झाली. तसेच समुद्राच्या पृष्ठभागावर तारली मासळी दिसू लागल्यानंतर या बेकायदेशीर एल.ई.डी. धारकांनी पुन्हा प्रखर प्रकाशाचा वापर करून तारलीची मासेमारी सुरू केली. रापण संघांनी याला विरोध केला असता, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या रापण संघांनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला.
रापण मासेमारी सागरीहद्द व अन्य मासेमारीसाठीचे जलधीक्षेत्र, परवाने व साहित्य वापराबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देऊन १२ वावाच्या आत चालणाऱ्या सर्व अनधिकृत मासेमारीवर तात्काळ बंदी घालावी. बेकायदेशीर एल.ई.डी. धारकांची रापण व गिलनेटधारकांच्या जलधीक्षेत्रातील घुसखोरी थांबवून परवाना अधिकाऱ्यांनी योग्य ते कायदेशीर निर्देश द्यावेत.
हवामान बदलाचा फटका, अनधिकृत मासेमारी आणि गेले ५ वर्षे सातत्याने किनाऱ्याजवळ येणारे जेलीफिशचे थवे यांमुळे पारंपरिक मच्छिमार आर्थिक गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छिमारांसाठी 'मत्स्यदुष्काळ' घोषित करावा आणि यासंबंधीचा कृती आराखडा वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी रापण मच्छिमारांच्या समस्या समजून घेत मत्स्य विकास अधिकारी प्रतीक महाडवाला आणि मत्स्य परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी चर्चा केली.
याप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाद्वारे अवगत करण्यात येणार असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात आले.

रापण मच्छिमारांनी वेधले मत्स्य विभागाचे लक्ष
