जिद्दीच्या बळावर कर्तृत्व सिद्ध केलेले आदर्शवत नेतृत्व!
सायकल दुरुस्ती व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करणारी कर्तृत्ववान स्त्रीशक्ती
स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’

या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे मालवण वायरी हिंदळेकरवाडा येथील सौ. पूजा प्रविण मिठबावकर या होय!

एखादा व्यवसाय यशस्वीपणे उभा करणे आणि तो सातत्याने टिकवून ठेवणे ही निश्चितच जिद्द, मेहनत, आणि चिकाटीची कसोटी च म्हणावी लागेल. त्यात ही पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या व्यववयात स्वतःच स्थान निर्माण करत अनेक आव्हानांवर मात करत तो व्यवसाय यशस्वी करणे ही बाब महिला साठी कौतुकास्पद आहे. मालवण वायरी हिदळेकरवाडा येथील सौ. पूजा मिठबावकर यांनी मलवण भरड नाका परिसरात " किशोर सायकल स्टोअर्स" या व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. जिद्द,आत्मविश्वास, आणि कुटूंबाची साथ यांच्या जोरावर त्यांनी व्यवसायासोबतच संसाराची जबाबदारी मोठ्या सामर्थ्याने पेलली आहे.

मूळ मालवण येथील रहिवाशी पूजा मिठबावकर यांचे शिक्षण मालवण येथे झाले. लहानपण पासूनच जीवनात त्यांचा खडतर प्रवास राहिला. लहान वयातच घरची जबाबदारी स्वीकारावी लागल्याने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.

सासऱ्यानी दाखविलेल्या विश्वासाचे केले सोने
मालवण भरड येथील " किशोर सायकल स्टोअर्स" पूर्वी प्रभाकर अनंत मिठबांवकर हे चालवीत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून सौ. पूजा मीठबांवकर या हा व्यवसाय चालवीत आहेत. सण १९९९ पासून तिने सायकल व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी आपल्या सासऱ्यानी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे मोठे आव्हान पूजा यांच्या समोर होते. मात्र त्यांनी या संधीचे सोने करत व्यवसायाची धुरा आत्मविश्वासाने सांभाळली. घरातील लहान मुलांची जबाबदारी, घरातील कामे, आणि व्यवसाय अशा तिहेरी आघाडीवर त्याचा संघर्ष सुरू होता. त्यांची मुलगी दीड वर्षाची असताना त्यांनी व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. सुरवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या." एक स्त्री सायकल व्यवसाय कसा संभाळणार?" अश्या शंका उपस्थित होत होत्या काहींनी त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्या बोलण्याने त्या खचल्या नाहीत उलट स्वतःच्या कर्तृत्वातून उत्तर देण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांचे पती आणि भावंडांची मिळालेली साथ त्यांच्या प्रवासाची मोठी ताकद ठरली.
कोणत्याही व्यवसायात प्रामाणिक सेवा आणि विश्वास तो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. पूजानेही आपल्या कामातून ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर भर दिला. अडचणी आल्या, आव्हाने उभी राहिली; परंतु त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत, जबाबदारीची जाणीव आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी किशोर सायकल स्टोअर्सची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. महिलांनी ठरवले, तर त्या कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, याचे पूजा मिठबावकर या उत्तम उदाहरण आहेत. इतरांनी आपल्या क्षमतेवर शंका घेतली म्हणून थांबून न राहता, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहणे, हा त्यांच्या जीवनप्रवासाचा महत्त्वाचा संदेश आहे.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतले कष्ट
व्यवसाय सांभाळताना पूजा यांनी आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांकडेही कधी दुर्लक्ष केले नाही. स्वतःच्या कष्टातून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांचे भविष्य घडवले. मुलीला स्वतःच्या पायावर उभे केले, त्यांचे लग्नही केले.
विशेष म्हणजे, आज त्यांची मुलगीदेखील व्यवसाय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. मालवणच्या रॉकगार्डन परिसरात ती स्वतःचे दुकान चालवते. आईकडून मिळालेला मेहनतीचा आणि स्वावलंबनाचा वारसा ती पुढे नेत आहे. त्यांचा मुलगाही कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण करून मुंबईतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहे. मुलांच्या यशात पूजाच्या त्यागाचा, कष्टाचा आणि कुटुंबासाठी केलेल्या धडपडीचा मोठा वाटा आहे. मुलांना केवळ शिक्षण देणे नव्हे, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणे, हेही त्यांनी साध्य केले.

व्यवसायात काळानुरूप बदल आणि उत्पन्नाच्या नव्या संधी शोधण्याचे महत्त्व जाणतात. म्हणूनच सायकल व्यवसायासोबत त्यांनी गेल्या सहा-सात वर्षांपासून हंगामी जोडव्यवसायालाही सुरुवात केली. दिवाळीच्या काळात आकर्षक कंदील विक्री आणि होळीच्या सणात रंग व अन्य साहित्य विक्री करून त्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करतात. सणासुदीच्या काळातील ग्राहकांची गरज ओळखून केलेला हा प्रयत्न त्यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीचे दर्शन घडवतो. एका व्यवसायावर अवलंबून न राहता, उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण करण्याची त्यांची वृत्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.

संसार आणि व्यवसायाचा साधलेला समतोल
व्यवसायातील जबाबदाऱ्या सांभाळताना घरातील माणसांची काळजी घेणे, कुटुंबाला वेळ देणे आणि मुलांच्या भविष्यासाठी धडपडणे, या सगळ्याचा समतोल साधणे सोपे नसते. मात्र, पूजा मिठबावकर यांनी या सर्व जबाबदाऱ्या संयमाने आणि कष्टाने पार पाडल्या. त्यांच्या प्रवासात कुटुंबाची साथ महत्त्वाची ठरली; पण मिळालेल्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि मेहनत त्यांनी स्वतःच्या बळावर दाखवून दिली. आज त्यांच्या प्रवासाकडे पाहताना एका महिलेने व्यवसाय सांभाळला एवढाच अर्थ निघत नाही, तर तिने प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःवरील विश्वास कायम ठेवत कुटुंबाचे भविष्य घडवले, स्वतःची ओळख निर्माण केली आणि पुढील पिढीलाही स्वावलंबनाची प्रेरणा दिली, हे प्रकर्षाने जाणवते.

कर्तृत्वातून उमटलेली नवदुर्गा!
नवरात्रोत्सवात नवदुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. समाजातील अनेक महिला आपल्या कष्टातून, धैर्यातून आणि कर्तृत्वातून या शक्तिरूपाचे दर्शन घडवत असतात. सौ. पूजा प्रविण मिठबावकर यांचाही प्रवास अशाच एका कर्तृत्ववान महिलेचा आहे. आव्हानांना न घाबरता, टीकेला न जुमानता आणि जबाबदाऱ्यांपासून दूर न पळता त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः घडवला. किशोर सायकल स्टोअर्सच्या माध्यमातून व्यवसायाची परंपरा पुढे नेताना त्यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवले आणि मुलीलाही व्यवसायाच्या क्षेत्रात उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या आयुष्याचा संदेश स्पष्ट आहे.
महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, मेहनतीची तयारी ठेवली आणि जिद्दीने वाटचाल केली, तर कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी अशक्य नाही.
अशा या जिद्दी, कष्टाळू आणि कर्तृत्ववान नेतृत्व सौ. पूजा प्रविण मिठबावकर यांचा जीवन प्रवास संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या सौ. पूजा प्रविण मिठबावकर. या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील सामाजिक, व्यावसायिक वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
▪️ अमित खोत | मालवण

