खैदा-कातवड गावची सुकन्या युवा भजनरत्न
भजन कलेने रसिकश्रोत्यांची मने जिंकत आहेत
स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’
या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे मालवण खैदा-कातवड गावची कु.तन्वी गणपत बागवे!
भजन क्षेत्रातून आपल्याला आत्मविश्वास, संस्कार,वक्तृत्व आणि समाजात निर्भीडपणे उभे राहण्याचे धाडस मिळाले. भजन सेवेतून परमेश्वराच्या चरणी समरस होता येते. कोकणची पारंपरिकता आणि संस्कृती जपत समाज सेवेसाठी कार्य करण्याचा आपला मानस आहे, असे मत खैदा-कातवड गावची सुकन्या, युवा भजनरत्न कु.तन्वी गणपत बागवे यांनी व्यक्त केले.

मालवण तालुक्यातील कातवड गावच्या तन्वी बागवे यांनी आपल्या सुमधुर भजन गायनातून भजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासून घरात असलेल्या भक्तिमय वातावरणामुळे त्यांच्या मनावर भजनाचे संस्कार झाले. घरात ऐकायला मिळणारे भजन, देवाचे नामस्मरण आणि भक्तीमय वातावरण यांतून त्यांना भजन कलेची गोडी लागली. अकरावीत असल्यापासून त्यांनी भजन सेवेचा श्रीगणेशा केला. संगीत शिकून आपल्या कलेच्या माध्यमातून गावाचे आणि आई-वडिलांचे नाव मोठे करावे, हा ध्यास तिने मनाशी बाळगलाआहे.
गुरुंच्या मार्गदर्शनातून भजन क्षेत्रात वाटचाल
भजन क्षेत्रातील वाटचालीत कातवड गावचे आदरणीय जेष्ठ बुवा मधुकर नलावडे, यांच्या जवळ भजन कस कराव याचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांना बुवा भूषण लोके, व काही काळ मंगेश नलावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून तन्वी यांनी भजन गायनाचा सराव सुरू ठेवत या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली. हार्मोनियम, पखवाज यांसारख्या वाद्यांची ओळख करून घेत त्यांनी भक्तिसंगीताची साधना सुरू ठेवली. भजनाच्या माध्यमातून समाजापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचविण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
महिला वारकरी भजन मंडळ ते संगीत भजन मंडळ
कातवड गावात पहिले महिला वारकरी दिंडी भजन मंडळ सुरू करण्याच्या उपक्रमात तन्वी यांचा मोलाचा सहभाग होता. कातवड गावात महिला वारकरी दिंडी भजनाची मुहूर्तमेढ तिने रोवली. काही वर्षातच या मंडळाची भजने दूरवर पोहोचली. मात्र, वारकरी दिंडी भजनातील नृत्यासाठी आवश्यक असलेल्या मुलींची संख्या कमी असल्याने सुमारे तीन ते चार वर्षांनंतर हा उपक्रम थांबवावा लागला. भजन सेवा बंद पडावी, असे तन्वी यांना वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी नव्या पद्धतीने भजन मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. चार-पाच सहकाऱ्यांना सोबत घेऊन संगीत भजन सुरू करण्याच्या संकल्पातून ‘श्री स्वामी कृपा महिला प्रासादिक भजन मंडळ, कातवड’ या मंडळाची स्थापना तीने केली. महिलांनाही भजन क्षेत्रात आपली कला सादर करता यावी, भक्तीची परंपरा जपली जावी आणि नव्या पिढीला संगीताची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तिची वाटचाल सुरू आहे.
भजन ही केवळ कला नव्हे, तर मनःशांतीचा मार्ग!
भजन ही केवळ संगीताची कला नसून मनाला शांती देणारे आणि समाजाला भक्तीच्या धाग्यात बांधणारे माध्यम आहे, अशी तन्वी यांची भावना आहे. आपल्या गायनातून भक्तिभाव व्यक्त करताना भजन रसिकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भक्ती, कला आणि संस्कृती यांचा संगम साधत सामाजिक क्षेत्रातही सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची इच्छा आहे. केवळ स्वतःचे करिअर घडविणे हेच तिचे ध्येय नसून समाजात भजन कला आणि नारीशक्तीचा ठसा उमटविणे, महिलांना प्रोत्साहन देणे आणि कोकणची पारंपरिक संस्कृती जपणे, यासाठी तिला कार्य करायचे आहे. भजन आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तीची सेवा अखंड सुरू ठेवण्याचा तीचा संकल्प आहे.
नवदुर्गेच्या आशीर्वादाने नारीशक्तीचा जागर!
शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा उत्सव. या पवित्र पर्वात तन्वी बागवे यांच्यासारख्या तरुणींची सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल नारीशक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडवते. आपल्या कलेच्या माध्यमातून भक्तीची परंपरा जपणाऱ्या आणि महिला भजन मंडळाच्या माध्यमातून इतर महिलांनाही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तन्वी यांची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे. नवदुर्गेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात ऊर्जा, सामर्थ्य, शौर्य आणि विजयाचा उत्साह नांदो. मातृशक्तीच्या तेजाने प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो आणि समाजात नारीशक्तीचा अभिमान अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा!

संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या कु.तन्वी गणपत बागवे या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील भजन, संगीत क्षेत्रातील वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

