Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सौ.शीतल अजय भोवड

सौ.शीतल अजय भोवड

उद्योजिका, निवेदिका, गायिका अशा त्रिवेणी संगमातून घडला आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रवास

स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे:
प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’

या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील सौ.शीतल अजय भोवड..!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी- सांगुळवाडी येथील सौ.शीतल अजय भोवड यांचा जन्म कुडाळ हिर्लोक गावी झाला.आज त्या विविध क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण करत आहेत. नवरात्रीत आपण आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा करतो. दुर्गेचे रूप हे सामर्थ्याचे, सरस्वतीचे रूप कलेचे, तर अन्नपूर्णेचे रूप पोषणाचे प्रतीक आहे. शीतलताईंच्या व्यक्तिमत्त्वातही कर्तृत्वाचे सामर्थ्य, कलेची अभिव्यक्ती, उद्योजकतेची जिद्द आणि विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्याची क्षमता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. स्त्री म्हणजे केवळ घराचा आधार नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने कुटुंब, व्यवसाय आणि समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी शक्ती! या स्त्रीशक्तीचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सौ. शीतल अजय भोवड या होय.
मर्स्क सारख्या नामांकित कंपनीत कार्यरत असताना त्यांनी नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आवडी निवडी यांचा सुरेख समतोल साधला. नोकरीच्या व्यापातही आपल्या कलागुणांना त्यांनी जपले आणि आज पूर्णवेळ सूत्रसंचालिका व निवेदिका म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ, साखरपुडा, नामकरण सोहळे, दहीहंडी उत्सव, मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सोहळ्यांना आपल्या प्रभावी वाणीने आणि उत्साही निवेदनाने रंगत आणण्याचे काम त्या करतात.
सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी आपल्या उद्योजकतेलाही वाव दिला आहे. ‘स्वरभी’ या नावाने घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय करताना मालवणी खाद्यसंस्कृतीची चव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर गायनाची आवडही त्यांनी जपली आहे. निवेदन, गायन आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यांनी खुलवले आहेत. एकीकडे सूत्रसंचालनाच्या माध्यमातून अनेकांच्या आनंदसोहळ्यांत उत्साह निर्माण करायचा, दुसरीकडे आपल्या हातच्या चविष्ट पदार्थांतून खवय्यांना समाधान द्यायचे आणि स्वतःच्या कलागुणांनाही सतत प्रोत्साहन द्यायचे, ही त्यांची कार्यशैली त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. स्वतःची स्वप्ने पूर्ण करताना विविध जबाबदाऱ्यांना न्याय देणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वातून इतर महिलांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवणाऱ्या सौ. शीतल कानडे-भोवड यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव होणे ही त्यांच्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि बहुआयामी कर्तृत्वाचा यथोचित सन्मान आहे.

संघर्षाच्या काट्यातून फुललेले अष्टपैलू कर्तृत्व: निवेदिका, गायिका सौ. शीतल अजय भोवड!
काही माणसे परिस्थितीचे गुलाम होतात, तर काही माणसे परिस्थितीला आपले गुलाम बनवून स्वतःचे नशीब स्वतः लिहितात. संघर्षाच्या अथांग समुद्रातून पोहून निघत, आज कला आणि समाजकार्याच्या क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या उत्कृष्ट निवेदिका, गायिका आणि समाजसेविका सौ. शीतल अजय भोवड यांचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे एक जिवंत उदाहरण आहे. आज समाजात एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने घेतले जाणारे सौ.शीतल अजय भोवड' हे नाव एका रात्रीत घडलेले नाही, तर त्यामागे आहे काट्याकुट्यांचा, संस्कारांचा आणि जिद्दीचा मोठा प्रवास!

वडिलांचे संस्कार आणि आईची खंबीर साथ
शितल ताईंचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. इयत्ता सातवीमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर आणि कुटुंबातील 'मोठी मुलगी' म्हणून शीतल यांच्यावर आली. आई शिकलेली नसतानाही तिने तिन्ही मुलांना मोठ्या ताकदीने आणि उत्तम संस्कारांनी घडवले. शीतल यांच्या वडिलांची एक शिकवण होती की, "तुझ्या घराच्या बाहेर जेवढ्या चपला असतील, तेच तुझ्या घराचे सुख आणि तीच तुझी खरी श्रीमंती!" तर आईने नेहमी शिकवले, "कोणालाही द्यायचे असेल तर उरलेले अन्न किंवा वस्तू कधीच देऊ नकोस, आपल्या भरलेल्या ताटातला घास इतरांना देता आला पाहिजे, तीच खरी माणुसकी." आई-वडिलांचे हेच संस्कार जपत शीतल ताई आज मोठ्या अभिमानाने समाजकार्य करत आहेत.

पहाटे पावणे चार वाजता सुरू होणारा दिनक्रम आणि हिणवणाऱ्यांना उत्तर
कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी वडिलांचा हार फुलांचा व्ययसाय हाती घेतला. अवघ्या १४-१५ वर्षांच्या वयात शीतल यांचा दिनक्रम थरारक होता. पहाटे पावणे चार वाजता घर सोडायचे, दादरला जाऊन फुलं आणायची, हार बनवायचे, लोकांच्या घरी जाऊन ते द्यायचे आणि सव्वासहा वाजेपर्यंत घरी येऊन परत शाळेत धावायचे. गरिबी इतकी होती की वह्या-पुस्तके, कपडे आणि चपलासुद्धा इतरांच्या वापराव्या लागत. पुस्तके नाहीत म्हणून अनेक लोकांनी हिणवले, टोमणे मारले. पण शीतल यांनी हार मानली नाही. कष्टाच्या जोरावर त्यांनी पदवी (Graduation) पूर्ण केली आणि त्या आपल्या संपूर्ण घराण्यातील पहिली पदवीधर मुलगी ठरल्या. आईने अभिमानाने त्यांच्या पाठीवर हात ठेवत सांगितले, "बाळा, आता तू हार विकायचं काम बंद कर आणि पुढे जा."

कॉर्पोरेट ते मातृत्वाचा टर्निंग पॉईंट: 'पोस्टपार्टम डिप्रेशन'वर मात
पदवीनंतर शीतल यांनी एका मल्टिनॅशनल (MNC) कंपनीत नोकरी मिळवली. तिथेही कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी उत्तम हुद्दा आणि चांगला पगार मिळवला. दरम्यानच्या काळात प्रेमविवाह झाला, सुखाचा संसार सुरू झाला आणि भोवड कुटुंबात एका गोंडस बाळाचे आगमन झाले. मात्र, सतत धडपडणाऱ्या आणि शांत न बसणाऱ्या शीतल ताई बाळंतपणानंतर 'पोस्टपार्टम मॅटर्निटी डिप्रेशन' (Postpartum Maternity Depression) च्या गर्तेत सापडल्या. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. फॅमिली डॉक्टरांनी दिलेला सल्ला - 'स्वतःला व्यस्त ठेवा आणि आवडीच्या गोष्टी करा' - या एका सल्ल्याने त्यांच्यातील सुप्त कलाकाराला जागे केले.

लोकांशी हितगूज आणि निवेदनाचा सहज प्रवास
मुळातच शीतल यांना लोकांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आणि हितगूज करायला, मदत करायला खूप आवडते. याच लोकांशी संवाद साधण्याच्या आवडीतून बोलत-बोलत त्या कधी 'उत्कृष्ट निवेदिका' झाल्या, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्यांची ही बोलण्याची सहज शैली लोकांना प्रचंड आवडत गेली आणि आज एक दर्जेदार निवेदिका म्हणून त्यांचे नाव सर्वत्र पसरले आहे.

६०-७० ट्रॉफींची पुंजी आणि 'कोरोना योद्धा' सन्मान

आज सौ. शीतल अजय भोवड हे नाव केवळ कलाक्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. एक उत्कृष्ट निवेदिका, प्रथम पारितोषिक विजेती अव्वल गायिका, प्रभावी लेखिका आणि संवेदनशील समाजसेविका म्हणून समाजाने त्यांना डोक्यावर घेतले आहे. गायन स्पर्धेत टॉपर म्हणून 'प्रथम क्रमांक' मिळवण्यापासून ते निवेदनाचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीची साक्ष त्यांच्या घरात दिमाखात सजलेल्या ६० ते ७० ट्रॉफीज (सन्मानचिन्हे) देतात. विशेषतः संकटकाळात त्यांनी केलेल्या अतुलनीय समाजकार्यासाठी त्यांना 'कोरोना योद्धा' पुरस्कार आणि विविध नामांकित सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. या प्रवासात भांडुपकरांनी त्यांना दिलेला उदंड प्रतिसाद आणि केलेले सन्मान ही त्यांच्या आयुष्याची खरी पुंजी आहे.

सिंधुताई सपकाळ आदर्श आणि नवोदित कलाकारांना पाठबळ

शीतल ताई थोर समाजसेविका आदरणीय सिंधुताई सपकाळ यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शीतल ताई समाजकार्य करत आहेत. समाजात असे अनेक हुन्नरी आणि गुणी कलाकार आहेत, ज्यांच्याकडे कला आहे पण पाठबळ (Support) नसल्यामुळे ते मागे राहतात. अशा गरजू आणि उपेक्षित कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना पुढे जाताना पाहणे, यातच शितल ताईंना खरे सुख मिळते. याशिवाय शैक्षणिक, वैद्यकीय मदत भासल्यास त्यासाठी सुद्धा शीतल अग्रेसर असतात.

यशाचे श्रेय: परिवार आणि गुरुजनांची खंबीर साथ

शीतल अत्यंत नम्रपणे सांगतात की, शीतल भोवड ही परिस्थितीमुळे घडली, पण त्या परिस्थितीवर मात कशी करायची हे मला माझ्या गुरुजनांनी शिकवले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी त्यांचे माहेरचे कुटुंब (आई, भाऊ आणि बहीण कानडे परिवार) खंबीरपणे उभे राहिले. तसेच त्यांचे पती श्री. अजय भोवड (जे स्वतः एक उत्तम भजनी बुवा आहेत) यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय त्या त्यांच्या शालेय शिक्षकांना आणि त्यांना कलाक्षेत्रात आणणारे त्यांचे मार्गदर्शक सन्माननीय किरण खोत सर, सन्माननीय सचिन कुडाळकर सर आणि अशा अनेक गुरुजनांना देतात, ज्यांनी त्यांना पावलोपावली साथ दिली.

महिलांना संदेश: 'कोमल है कमजोर नही तू...'

आपल्या प्रवासातून इतर महिलांना प्रेरणा देताना शीतल म्हणतात, "हिंदीत एक सुंदर गाणे आहे- 'कोमल है कमजोर नही तू, शक्ती का नाम ही नारी है...' जेव्हा जेव्हा आयुष्यात महिला खचतील किंवा डिप्रेशनमध्ये जातील, तेव्हा त्यांनी हे गाणे नक्की ऐकावे, यातून पुढे जाण्याचे प्रचंड बळ मिळते. जी स्त्री प्रसूतीच्या वेदना सहन करू शकते आणि निसर्गाच्या नवनिर्मितीची पुनरावृत्ती करू शकते, तिच्यामध्ये निसर्गानेच उपजत अथांग शक्ती दिली आहे. स्त्री एकटी पडली तरी खचू शकत नाही. तिच्याकडे स्वतः उभे राहण्याचे आणि इतरांना घडवण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःला आणि स्वतःमधील सुप्त कलागुणांना ओळखून ते विकसित केले पाहिजे. स्त्री म्हणून जन्म मिळणे हे आपले परमभाग्य आहे!"

जिद्द, कर्तृत्व, कला आणि संस्कारांचा सुरेख संगम असलेल्या सौ. शीतल अजय भोवड यांचा हा जीवनप्रवास आजच्या प्रत्येक व्यक्तीला संकटांशी लढण्याची आणि ध्येय गाठण्याची नवी उमेद देणारा आहे. संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या सौ. शीतल अजय भोवड या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

ruchira top