पाच विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; अमृता बागवे हिचे तीन पदकांसह घवघवीत यश
मंगेश नलावडे | मालवण : मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ओझर विद्यामंदिर, कांदळगावच्या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याची छाप उमटवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॅरम आणि मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करत पाच विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. यामध्ये अमृता गणेश बागवे हिने तीन क्रीडा प्रकारांत यश मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले.

१० ऑक्टोबर रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा येथे झालेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रुचिरा संजय कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर चिन्मयी राजेंद्र पारकर हिने पाचवा क्रमांक मिळवला. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रांजली संजय कुंभार हिने तृतीय क्रमांकाची कमाई केली. या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१३ ऑक्टोबर रोजी माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे पार पडलेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेतही प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अमृता गणेश बागवे हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक, तर लांब उडी आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तीन क्रीडा प्रकारांत यश मिळवत तिने आपल्या अष्टपैलू क्रीडाकौशल्याची प्रचिती दिली. याच गटात किमया उमेश चव्हाण हिने थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थिनींच्या या यशस्वी कामगिरीमागे एस. जे. सावंत, पी. के. राणे आणि रविराज जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तालुकास्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थिनींचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी. एस. परब, खजिनदार शरद परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश मोहन कदम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरी कदम आणि मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्यांनी यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
▪️ अमित खोत | मालवण

